नातेवाइकांकडे झोपायला जाणे पडले महागात, घरात झाली चोरी; रोख रकमेसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 18:20 IST2022-10-22T18:17:12+5:302022-10-22T18:20:13+5:30
तुमसर येथील घटना

नातेवाइकांकडे झोपायला जाणे पडले महागात, घरात झाली चोरी; रोख रकमेसह दागिने लंपास
भंडारा : नातेवाइकांच्या घरी झोपायला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. उघड्या घरात शिरून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना तुमसर येथील गांधी नगरात शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी तुमसर ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेघा महेंद्र भरडे (४४) यांचे तुमसरच्या गांधी नगरात घर आहे. शुक्रवारी रात्री त्या आपल्या नातेवाइकांकडे झोपण्यासाठी गेल्या हाेत्या. मात्र घराचे दार उघडेच राहिले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लाेखंडी कपाटात असलेल्या ५०० रुपयांच्या ४० नोटा वीस हजार रुपये, एक वापरातील सोन्याचे मंगळसूत्र वजन दहा ग्रॅम, एक जोडी सोन्याचे टाॅप्स, सोन्याच्या बिऱ्या, लहान मुलाच्या पाचव्या वजन एक ग्रॅम असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सकाळी त्या घरी आल्या असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, भंडारा शहरातील सूर्यकेतू नगरीतील एका घरातून चार लाखांचे दागिने चोरीस गेले होते.