राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 15:03 IST2022-10-19T15:01:16+5:302022-10-19T15:03:52+5:30
दुचाकीला मागून धडक; भिलेवाडाची घटना

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार, एक गंभीर
भंडारा : भरधाव ट्रकने मागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक भिलेवाडा येथे मंगळवारी घडली. महार्गावर गत काही दिवसांपासून दरराेज अपघाताच्या घटना घडत आहे.
मुकेश शिवदास तिरपुडे (४०) रा. शिवनीबांध ता. साकोली असे मृताचे नाव आहे. तो आशिष तिरपुडेसह आपल्या दुचाकीने (एमएच ४० बीए ९३२१) राष्ट्रीय महामार्गावरून भंडाराकडे मंगळवारी येत होता. भिलेवाडा येथे मागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३० बीसी ७७९९) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघेही खाली कोसळले व गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी दोघांनाही भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मुकेश तिरपुडेचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती होताच कारधाचे ठाणेदार राजकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ राहुल तिरपुडे यांनी कारधा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस हवालदार अशोक सरोदे करीत आहेत. गत काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून, अपघातात वाढ झाली आहे.