लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:35 IST2025-06-07T15:34:20+5:302025-06-07T15:35:10+5:30

पूरबाधित गावांना प्राधान्य : जूनमध्येच वितरित होणार रेशन धान्य

Beneficiaries will get 3 months of ration at once | लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी

Beneficiaries will get 3 months of ration at once

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. अतिवृष्टी, महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे.


जिल्ह्यात १५४ गावे नदीकाठावर असून १३० गावे दरवर्षी नदी व नाल्यांमुळे बाधित होतात. तालुका, जिल्हा मुख्यालयाशी नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आठवडाभर गावातच राहावे लागते. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. हा धोका ओळखून ग्रामीण भागात पावसाळ्यातील तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचे काम सुरू झालेले आहे. काही तालुक्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान पोहोचवून वाटपही सुरू केलेले आहे. यामुळे आपदेवेळी उडणारी तारांबळ थांबणार आहे. 


दुकानदार तीन महिन्यांचे धान्य कुठे ठेवणार?
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे जवळपास दोन महिन्यांचा धान्यसाठा करण्याची व्यवस्था आहे. बहुतांश दुकानदारांकडे हीसुद्धा व्यवस्था नाही. केवळ एका महिन्याचे ते धान्य साठवून ठेवू शकतात. मात्र, आता तीन महिन्यांचे धान्य प्राप्त होत असल्याने ते धान्य कोठे ठेवावे, असा प्रश्न आहे.


३० तारखेच्या आत धान्याची उचल करा
तीन महिन्यांच्या स्वस्त धान्याची उचल करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ३० जूनच्या आत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची उचल करावी लागणार आहे. 


अतिवृष्टी, पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून...
लाभार्थ्यांना अतिवृष्टी, पूरस्थितीत धान्याची उचल करताना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे.


"पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांची पूरपरिस्थितीमुळे अडचण होऊ नये, यादृष्टीने शासनाने जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदाराकडे धान्य पुरविण्यात आले आहे."
- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा

Web Title: Beneficiaries will get 3 months of ration at once