दिवसा घरफोडीतील अट्टल आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 23:40 IST2024-07-31T23:40:34+5:302024-07-31T23:40:51+5:30
कारधा पोलिसांची कारवाई : गराडा येथील ऐवज लंपासचे प्रकरण.

दिवसा घरफोडीतील अट्टल आरोपीला अटक
देवानंद नंदेश्वर/ भंडारा
भंडारा : कारधा पोलिस ठाणे हद्दीतील गराडा बुर्ज येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई कारधा पोलिसांनी केली. रामकृष्ण हरेश्वर मोहर्ले (६३, लालगंज, गुजरी चौक, नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भंडारा तालुक्यातील गराडा बुर्ज येथे १८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास चिंताबाई सुधाकर चवळे (३४, गराडा बुर्ज ता. भंडारा) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने संधी साधून घरातील गहु मण्याची पोत ६ ग्रॅम किंमती १२ हजार रुपये, गरसुली ०५ ग्रॅम किंमती १० हजार रुपये, कानातले ३ ग्रॅम किंमती ६ हजार रुपये, काळी गरसुली ०३ ग्रॅम किंमती ६ हजार रुपये, असे जुने वापरते सोन्याचे दागीने व रोख ७ हजार रुपये, असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. या घटनेची तक्रार कारधा पोलिसात करण्यात आली. तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा. न्या. संहिता २०२३ प्रमाणे ३०५,३०५ (अ), ३३१(३) कलमान्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, पोलिस उपनिरीक्षक किरण औताडे, हवालदार संदिप केंद्रे, पोलिस अंमलदार प्रदीप जगनाडे, अमोल वाघ, सोहेल शेख व सायबर सेल भंडारा यांचे मदतीने आरोपी रामकृष्ण हरेश्वर याला नागपुर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यातील चोरीचे ऐवज हस्तगत करण्यात आले.