शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळतात का? नागरिकांना 'जनऔषधी केंद्रा'ची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:35 IST2024-09-07T13:34:08+5:302024-09-07T13:35:12+5:30
भूखंड राखीव : रुग्णांना जनऔषधी केंद्र इमारत बांधकामाची प्रतीक्षा

Are cheap medicines available in government hospitals? Citizens are waiting for 'Jana Aushadhi Kendra'
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत २४ तास जेनेरिक औषधी मिळणार, असा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जेनेरिक औषधी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली भूखंडापुरते मर्यादित आहे. अद्यापही रुग्णांना जनऔषधी केंद्र इमारत बांधकामाची प्रतीक्षा आहे.
सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हावीत म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सरकारतर्फे 'जनऔषधी केंद्र' शीर्षकांतर्गत मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे बाजाराच्या तुलनेत किती तरी पटीने स्वस्त दरात गरिबांना औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. केंद्र सरकार जनऔषधी स्टोअरना लोकानुवर्ती रूप देण्याबाबत अत्यंत गंभीर आहे. या स्टोअरमध्ये सर्व औषधी उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील जनऔषधी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्हा रुग्णालयात सुरू होणार 'जनऔषधी केंद्र'
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रावर रुग्णांना आवश्यक ती औषधी उपलब्ध होणार आहे.
लोकमत'ने काय पाहिले?
संबंधित एजन्सीचे काम संथगतीने : शासनाच्या वतीने एजन्सीमार्फत जनऔषधी केंद्र चालविण्यात येणार आहे; परंतु संबंधित एजन्सीमार्फत केंद्र सुरू करण्यासंबंधी उदासीनता दिसून येत आहे. अद्यापही बांधकाम सुरू झालेले नाही.
जनऔषधी केंद्रासाठी केवळ भूखंड राखीव : जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात जनऔषधी केंद्राच्या बांधकामाविषयी एजन्सीची उदासीनता दिसून येते. केवळ भूखंड राखीव आहे. बांधकाम सुरु झाले नसल्यामुळे गती देणे गरजेचे झाले आहे.
७० टक्क्यांपर्यंत स्वस्तः २४ तास सेवा
जनऔषधी केंद्रावर जवळपास ५० ते ७० टक्क्यांपर्यंत औषधी स्वस्त असणार आहे. यात गोरगरिबांचा फायदा होणार असून, त्यांना आवश्यक ती औषधी कमी दरात उपलब्ध होण्यास मदत होईल.