तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:18 IST2023-04-03T13:16:26+5:302023-04-03T13:18:31+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधीत्व नसल्याच्या मुद्द्यावरून नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती
राजू बांते
मोहाडी (भंडारा) : मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधीत्व नसल्याच्या मुद्द्यावरून नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ही याचिका दाखल केली होती.
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती . २७ मार्च पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सोमवार ३ एप्रिल अखेरची दिनांक होती. आजच याचिकेवर सुनावणी झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर स्थगिती मिळाली आहे.
मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका न झाल्याने ५८ ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळाले नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित करण्यात यावी असे याचिकाकर्ते माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाकडे रिट याचिका क्रमांक ६८३८/२०२३दाखल केली होती. महाराष्ट्र राज्य, सचिव सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय मुंबई यासह ५ जणांना प्रतिवादी बनविण्यात आले होते. हरीश डांगरे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.