तेरवीसाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीचा टायर फुटल्याने अपघाती मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 13, 2024 18:54 IST2024-05-13T18:53:58+5:302024-05-13T18:54:41+5:30
Bhandara : साकोली तालुक्यातील शिवनी बांध तलावानजीक झाला अपघात

Accidental death of a young man on his way to Teravi due to burst tire of his bike
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नातेवाईकाकडे तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या युवकाच्या दुचाकीचा टायर साकोली तालुक्यातील शिवनी बांध तलावानजीक फुटला. यामुळे झालेल्या अपघातात दिघोरी आमगाव येथील आशिष सहदेव बोंद्रे या २७ वर्षिय तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, शिवणीबांध या गावी राहणाऱ्या आशिष बोंद्रे यांच्या एका नातेवाईकाकडे सोमवारी तेरवीचा कार्यक्रम होता. एक दिवसापूर्वी पत्नी कार्यक्रमासाठी गेली होती. त्यामुळे आशिषही सोमवारी १३ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकीने (एम एच ३६, व्ही २००८) निघाला होता. दरम्यान वाटेतच शिवनी बांध तलावाजवळ त्याच्या दुचाकीचा टायर फुटला. यामुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडला. उन्हाची वेळ असल्याने आणि गंभीर जखम झाल्याने अपघातात आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अपघाताची नोंद घेतली.