हरवला वैभवशाली वारसा ! गोंडराजाचा वाडा गेला, उपजीविकेसाठी विकावी लागली पूर्वजांची शस्त्रास्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:03 IST2026-04-07T14:02:01+5:302026-04-07T14:03:10+5:30
Bhandara : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात एकेकाळी जमिनदारी उपभोगलेले गोंड राजाचे वंशज तुकारामबापू पंधरे यांच्या मालकीचा जांभळी (खांबा) येथे दोन एकर परिसरात वाडा होता.

A glorious legacy lost! The palace of the Gond king was lost, the weapons of the ancestors had to be sold for a living.
गोविंद हटवार
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (भंडारा) : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात एकेकाळी जमिनदारी उपभोगलेले गोंड राजाचे वंशज तुकारामबापू पंधरे यांच्या मालकीचा जांभळी (खांबा) येथे दोन एकर परिसरात वाडा होता. त्या वाड्यात घोड्यांची बग्गी होती. तलवार, बंदुका आदी शस्त्रास्त्रे होती. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी जमीनदाराची स्वत:च्या मालकीची कैद होती. पण, आता या वाड्याच्या जागेवर आता फक्त झोपडी आणि लाकडी अवशेष शिल्लक आहेत. वारशापोटी मिळालेल्या बंदुका उपजीविकेसाठी विकाव्या लागल्या आणि तलवारी पुजेपुरत्या मर्यादित झाल्या आहेत.
एकेकाळचे जमीनदार तुकारामबापू हरिसिंग पंधरे (मोकाशी) यांच्या पत्नी बजाबाई आणि भागूबाईच्या नावे १९६९-७० च्या रेकार्डनुसार पिटेझरी येथे ३४ एकर जागा आहे. परंतु, त्यांचा नातू भुवनशहाँ पंधरे यांच्या मालकीचे पिटेझरीत काहीच नाही. त्यांच्या मालकीच्या काही जागांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले. काहींना त्यांच्या पूर्वजांनी घरे बांधण्यासाठी जागा दान केली. त्यानंतर उर्वरित जागा सरकारजमा झाली. त्याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी पिटेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय बनले. वनपालासाठी पडीत असलेले क्वाटर्स तयार झाले. आता जमिनीचे जुने गटनंबर बदलले गेले. त्यामुळे ही जागा माझ्याच आजीची होती, हे सिद्ध करण्यासाठी भूवनशहाँ शासकीय दरबारी खेटा मारत आहेत.
दहा वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू
भूवनशहाँचे वडील रामचंद्रबापू पंधरे यांनी संबंधित जमिनींसदर्भात पत्रव्यवहार केला. २००० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा मुलगा भूवनशाँ केवळ दहा वर्षांचा होता. त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीबाबत त्याला काहीही माहित नाही. रामचंद्रबापू यांचे मुनिम (पीए) छोटू पटले यांना मात्र याची खडानखडा माहिती आहे. पण, सरकारी बाबूंसमोर सामान्यांचे काही चालत नाही. कोर्टात जाण्याची ऐपत नाही. त्यामुळे सारे काही अधांतरी आहे.
पांगळीच्या जमिनीसाठी कोर्टात धाव
पांगळीत ७५० एकर जमीन तुकारामबापू हरिसिंग पंधरे यांची होती. त्यावेळी भंडाऱ्याचे तत्कालीत पांडे महालाचे मालक यांनी त्या जागेवर दावा केला होता. त्यानंतर प्रकरण भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालय गेले. १९१२ च्या निर्णयानुसार ही ७५० एकर जागेची मालकी तुकारामबापूंचे वडील हरिसिंग पंधरे यांची असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्या न्यायालयाच्या निकालाची प्रत भूवनशहाँ यांनी अजूनही जपून ठेवली आहे.