पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना झाली विषबाधा; तुमसर तालुक्यातील सुकळी येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:58 IST2025-03-12T14:57:26+5:302025-03-12T14:58:47+5:30
सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर : वैद्यकीय चमू गावात

30 people were poisoned after eating panipuri; The incident happened in Sukali, Tumsar taluka
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली.
सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्यांकडील पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी व अन्नातून तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी, येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. १० मार्च रोजी सकाळी हा प्रकार हळूहळू समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना आंधळगाव येथील डॉ. अनिकेत सपाटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून त्यांना मंगळवार, ११ मार्चला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विषबाधा झालेल्या तीसही रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
११ मार्चला सुकळी येथे भरती असलेल्या २२ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तसेच रोहा, आंधळगाव, जांब व कांद्री येथील आठ रूग्णांनाही घरी सोडले.
यांना झाली विषबाधा
विषबाधा झालेल्यांमध्ये हर्षदा नान्हे, तन्हू नान्हे, अश्विनी बुरडे, कविता डोळस, अक्षय डोळस, निहार बांडेबुचे, श्रेयश ठवकर, रियांश ठवकर, कौशिक जगनाडे, दिवेश शहारे, भावेश राऊत, सुप्रिया नेरकर, प्रियांशी राऊत, कांता राऊत, मनीषा राऊत, संकेत राऊत, रेखा राऊत, प्रज्वल भुरे, योगेश शहारे, प्रतीक शहारे, संजय शेंडे, मंगेश शेंडे, वर्षा डोळस, श्रेया डोळस, सतीश मुंडे (सर्व रा. सुकळी) व इतरांचा समावेश आहे.
वैद्यकीय चमू गावात
सुकळी येथे बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय चमू गावात दाखल झाली. रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. विषबाधीतांची भेट जि. प. सभापती नरेश ईश्वरकर, देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रहांगडाले, बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी शेख यांनी भेट दिली.
"अन्नातून व पाणीपुरीतून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी बेटाळा व देव्हाडी आरोग्य केंद्रात तर काहींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे."
- डॉ. व्ही. आर. रहांगडाले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हाडी