मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:37 IST2025-05-02T15:36:06+5:302025-05-02T15:37:50+5:30
प्रशासनावर नाराजी : भटक्या, विमुक्त समाजाचे घरकूल अधांतरी

मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या व विमुक्त समाजाच्या कुटुंबांसाठी असलेल्या घरकूल योजनेकरिता आलेला ३ कोटी रुपयांचा संबंधित निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला. यासंदर्भात ढिवर समाज संघटनेने समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन मडावी यांना निवेदन देत, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली. भंडारा जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिवर समाज संघटनेने संघर्ष केला. सततच्या आंदोलनामुळे ४ हजार घरकुलांना मंजुरी मिळवण्यात यश आले. मात्र, ३० कोटींच्यावर निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यानंतर, या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला.
संघटनेद्वारे गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निधी मिळवण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांच्या आश्वासनानुसार, ३१ मार्चपर्यंत ३ कोटी रुपयांचा निधी बीडीएस प्रणालीद्वारे देण्यात आला. पण, सामाजिक न्याय विभागाद्वारे ३१ मार्चपर्यंत निधी वितरीत न केल्यामुळे संबंधित निधी शासनाकडे परत गेला. हलगर्जीपणामुळे या योजनेंतर्गत अनेक भटक्या कुटुंबांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
आंदोलनाची तयारी
दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी. घरकुलांसाठी निधीचे वाटप तातडीने करावे. अन्यथा, संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असा इशारा करचखेडा सरपंच व जिल्हा संघटक सुभाष उके, मार्गदर्शक डॉ. अविनाश नान्हे, जिल्हा संघटक प्रवीण मडामे, संघटक रवी उके, पंकज राऊत यांनी दिला आहे.
निधीच्या प्रतीक्षेत ससेहोलपट
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत पहिल्या ५ वर्षामध्ये एकही लाभार्थी नव्हता. मात्र, ढीवर समाज संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे घरकुलांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. परंतु, गत दीड वर्षांपासून मंजूर घरकुलांसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे हजारो भटक्या कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नदीकाठच्या गरीब भटक्या व विमुक्त समाजातील लोकांनी आपली मातीची कौलांची घरे तोडून नवीन घर उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण, निधीच्या प्रतीक्षेत ही घरे अपूर्ण आहेत.
चौकशीची मागणी
घरकुल योजनेसाठी आलेला ३ कोटींचा निधी परत गेल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे
"मुक्त वसाहत योजनेच्या घरकुलासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीकरिता जोमाने प्रयत्न केले जातील. तसेच ३ कोटींचा निधी परत गेल्यासंदर्भात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल."
- सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग
"यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली. मात्र, शासनाकडे ३० कोटीपेक्षा अधिक निधी प्रलंबित आहे. त्यातच मार्च महिन्यात ३ कोटींचा निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला ही शोकांतिका आहे. घरकुलांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत असून, भटक्या समाजाला स्थैर्य मिळवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे."
- सुरेश खंगार, अशासकीय सदस्य मुक्त वसाहत योजना