२१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ; १० कोटी ४७ लाखांच्या निधीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:30 IST2025-04-08T15:27:31+5:302025-04-08T15:30:06+5:30

ज्ञानार्जनावर परिणाम : ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांमधून नाराजीचा सूर !

219 classrooms awaiting repair; Funds of Rs. 10 crore 47 lakhs required | २१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ; १० कोटी ४७ लाखांच्या निधीची गरज

219 classrooms awaiting repair; Funds of Rs. 10 crore 47 lakhs required

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० पेक्षा अधिक शाळांमधील २१९ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे या वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या असून, त्यात विद्यार्थ्यांना बसविण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारणामुळे वर्गखोल्या कमी झाल्याने ज्ञानार्जनावर परिणाम होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.


जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या ७९४ शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळांना दर्जेदार इमारती मिळाव्यात, वर्गखोल्यांची स्थिती उत्तम असायला हवी, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.


दरम्यान, सद्यस्थितीत २१९ वर्गखोल्यांची दुरुस्ती प्रलंबित असून, संबंधित सर्व वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे दुरुस्तीसाठी १० कोटी ४७लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, निधी उपलब्ध झाल्यानंतरच हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.


दुरुस्त नसलेल्या शाळांत शिकतात हजारो विद्यार्थी

  • दुरुस्तीअभावी वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आलेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.
  • जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने १५२ शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अद्यापही यातील काही कामे रखडली आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे.


या वर्गखोल्यांची दुरुस्ती कधी होणार
तालुका               दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील

भंडारा                       ४१
मोहाडी                      ३०
तुमसर                       ५४
साकोली                     १३
लाखनी                      १८
लाखांदूर                    ३७
पवनी                        २६
एकूण                       २१९


१५२ वर्गखोल्यांसाठी ७ कोटींची तरतूद
सन २०२४-२५ मध्ये एकूण १५२ वर्गखोल्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७ कोटी ६३ लाखांची तरतूद करण्यात आली. यातील अनेक वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण तर, काही वर्गखोल्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ज्यांचे बांधकाम रखडले आहे, त्यांनी येत्या मार्च महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही पुन्हा जिल्ह्यातील २१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी निधीची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत.


७९४ शाळा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आहेत
जिल्ह्यातील २१९ वर्गखोल्यांची दैनावस्था झाली असून, 'डीपीसी'कडे मागणी केली असली तरी निधी मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रश्न कायम आहे.


"जिल्ह्यातील सुमारे ५० शाळांमधील २१९ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी निधी मिळण्यासंबंधी जिल्हा नियोजन समितीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील."
- रविंद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, भंडारा

Web Title: 219 classrooms awaiting repair; Funds of Rs. 10 crore 47 lakhs required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.