जिल्ह्यात १७ हजार लाडक्या बहिणी ठरल्या लाभास अपात्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:28 IST2025-03-10T15:26:40+5:302025-03-10T15:28:18+5:30

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना : अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही.

17 thousand beloved sisters in the district were declared ineligible for benefits! | जिल्ह्यात १७ हजार लाडक्या बहिणी ठरल्या लाभास अपात्र !

17 thousand beloved sisters in the district were declared ineligible for benefits!

युवराज गोमासे 
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची ७मार्चपूर्वीच फेरतपासणी पूर्ण झालेली आहे. या तपासणीत जिल्ह्यातील १७हजार १८३ लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. सत्तेत बसलेल्या भावाने निवडणूक जिंकण्यासाठी आपली फसवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे.


योजनसाठी अपात्र झालेल्यांकडून यापूर्वी दिलेली अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही. मात्र, त्यांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून सुमारे २ लाख ९९ हजार ८७१ महिलांनी प्रस्तावाची नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ८२ हजार ७८८ महिला 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आल्या. विधानसभा निवडणुका आटोपून नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व प्रस्तावांची जिल्ह्यातील सातही तालुकास्तरीय समितीकडून फेरतपासणी सुरू करण्यात आली होती.


८ मार्चला १ हजार ५०० रुपयांचे वितरण
निकषात न बसणाऱ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिमाह १५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. अपात्र ठरलेल्या १७ हजार १८३ लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्याची माहिती आहे.


निवडणुकांपूर्वी पात्र, आता केले अपात्र
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिण योजना अंमलात आणली गेली. वारेमाप प्रचार व प्रसार करून महिलांची मते मिळविण्यात आली. मात्र, सत्ता मिळताच चारचाकी वाहन, नोकरीवर असलेले, आयकर भरणारे व दुसऱ्या राज्यात गेलेल्यांचे अर्ज अपात्र करण्याचे निर्देश देण्यात आले.


१४ महिलांनी स्वतःहून लाभ सोडला
जिल्ह्यात आतापर्यंत १४ महिलांनी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र या महिलांनी स्वतःहून माघार घेत योजनेचा लाभ नाकारला असल्याचे लेखी पत्र संबंधित तालुक्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केले. 


१००% अर्जाची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणी
तालुकास्तरीय समितींच्या तपासणीत १७ हजार १८३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव अपात्र (रिजेक्ट) ठरविण्यात आले आहे. तर २.८२ लाख अर्ज मंजूर झाले.

तालुका निहाय लाभार्थी
तालुका                   पात्र                   अपात्र    

भंडारा                  ६१,४९७                 ३,१३३
लाखनी                 २९,१५०                 २,२६२
लाखांदूर                ३१,७९७                २,१७६
मोहाडी                 ३२,७४२                 १,८७०
पवनी                   ३६,३२२                  २,७९९
साकोली               ३४,३३०                   २,३७९
तुमसर                 ५५,९५०                  २,५६४
एकूण                 २,८२,७८८               १७,१८३


घोषणाचे २१०० रुपयांचा लाभ केव्हा मिळणार?

  • लाडकी बहिणी योजनेत १ प्रारंभापासून दीड हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीदरम्यान २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती.
  • परंतु, सत्ता मिळून अद्यापही लाभदेण्यात आलेला नाही. त्यामुळे दरमहा २१०० रुपयांचा लाभ केव्हा मिळणार, हा प्रश्न सतावतो आहे.
  • सर्वाधिक पात्र लाभार्थी भंडारा तालुक्यातील असून यांची संख्या ६१ हजार ४९७ इतकी आहे. तर सर्वात कमी पात्र लाभार्थ्यांची संख्या लाखनी तालुक्यातील आहे. पात्र लाभार्थ्यांमध्ये २९ हजार १५० लाडक्या बहिनींचा समावेश आहे.

Web Title: 17 thousand beloved sisters in the district were declared ineligible for benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.