नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:32 IST2025-08-16T19:31:34+5:302025-08-16T19:32:47+5:30
Bhandara : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाला दिलासा

1,582 patients in Nagpur division receive assistance of Rs 13.81 crore from Chief Minister's Relief Fund
भंडारा : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात गत सात महिन्यांत तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे.
पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख डॉ. मनिष बत्रा यांनी सांगितले.
बॉक्स
विभागातील जिल्हानिहाय मदत (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
- भंडारा ३१ २९,३५,०००
- नागपूर १३९६ १२,१६,८२,०००
- वर्धा ४१ ३९,५५,०००
- गोंदिया ५० ३९,००,०००
- चंद्रपूर ५४ ४७,४८,०००
- गडचिरोली ९ ९,००,०००
२० गंभीर आजारांसाठी मदत:
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन), रस्ते अपघात, बालकांच्या शस्त्रक्रिया, हिप व गुडघा रिप्लेसमेंट, मेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधन, बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशुंचे आजार आद
आवश्यक कागदपत्रे:
रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड, रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य), तहसील उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी), वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र, एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी), झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी).