मुख्यमंत्री योजनादूत' मध्ये १३९५ उमेदवारांनी केले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:21 IST2024-09-12T11:21:00+5:302024-09-12T11:21:53+5:30
१३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ : ६४० योजनादुतांची होणार निवड

1395 candidates applied for Chief Minister Yojandoot'
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात 'मुख्यमंत्री योजनादूत'मध्ये १३०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादुतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादुतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ६४० योजनादुतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, बुधवारी सकाळपर्यंत १३९५ उमेदवारांची नोंदणी झाली आहे.
राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.
योजनेचे स्वरूप
- प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर, शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादुतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
- या योजनादुतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.