Tilkund Chaturthi 2023: यंदा २४ आणि २५ जानेवारीत विभागून आली आहे तिलकुंद चतुर्थी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:29 IST2023-01-23T13:24:19+5:302023-01-23T13:29:38+5:30
Tilkund Chaturthi 2023: मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात, माघी गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर हे व्रत कसे करायचे ते जाणून घ्या!

Tilkund Chaturthi 2023: यंदा २४ आणि २५ जानेवारीत विभागून आली आहे तिलकुंद चतुर्थी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी!
मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते. म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रतांची सांगड तीळाशी घातल्याचे निदर्शनास येते. मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ मास सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आली आहे. कारण २४ जानेवारीला दुपारी १५. २२ मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरु होत आहे, मात्र ही तिथी २५ जानेवारीचा सूर्योदय बघणार असल्याने दोन्ही दिवशी हे व्रत यथाशक्ती करता येईल.
तिलकुंद चतुर्थी व्रताचे फायदे:
शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या सुख समृध्दीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते. तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात. गणरायाला यादिवशी पांढरे तिळ वाहल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तिलकुंद चतुर्थी व्रताचा विधी :
चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून शुचिर्भूत व्हावे. अथर्वशीर्षाची आवर्तने करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा. कुंकू लावावे. फुलं वाहावीत. तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चतुर्थीच्या निमित्ताने गरिबाला तीळ आणि कोरडा शिधा अर्थात धान्य दान करावे. 'गं गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. काही भाविक या तिथीला उपास करतात आणि संकष्टीला चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतात तसा हा उपास चंद्र दर्शन घेऊन सोडतात. जर उपास शक्य नसेल तर देवदर्शन, नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय अवश्य करावेत.
माघी गणेश जन्म:
माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता, म्हणून ही जन्म तिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून माहीत नसते. मात्र या निमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा, सत्संग व्हावा हाच या व्रतामागचा शुद्ध हेतू आहे.