Ganesh Mahotsav: येथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला होते बाप्पांची प्रतिष्ठापना, कोकणातील गावामध्ये आहे आगळी-वेगळी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 12:16 IST2022-08-31T12:15:09+5:302022-08-31T12:16:12+5:30
Ganesh Mahotsav: आजपासून राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. कोकणातील गणेशोत्सवाचा थाट तर औरच असतो. दरम्यान, कोकणातील एका गावात असं गणपती मंदिर आहे जिथे गणेशोत्सवामध्ये नाही तर दिवाळीला गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते.

Ganesh Mahotsav: येथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला होते बाप्पांची प्रतिष्ठापना, कोकणातील गावामध्ये आहे आगळी-वेगळी परंपरा
वेंगुर्ला - आजपासून राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. कोकणातील गणेशोत्सवाचा थाट तर औरच असतो. दरम्यान, कोकणातील एका गावात असं गणपती मंदिर आहे जिथे गणेशोत्सवामध्ये नाही तर दिवाळीला गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. दिवाळीला लक्ष्मीची पूजा सर्वत्र केली जाते. मात्र कोकणातील या गावात असलेल्या गणपती मंदिरात दिवाळीला लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. कोकणामधील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावात हे अनोखे गणेश मंदिर आहे. काल लक्ष्मीपूजना दिवळी येथील मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.
गणपती म्हणजे मराठी माणसाचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रात गणपतीची अनेक जागृत मंदिरे आढळतात. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते. तर काही मंदिरांमध्ये गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. मात्र उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र या सर्वाला अपवाद आहे. उभादांडा हे गाव वेंगुर्ला शहराला लागून आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या शेजारीच उभादांडा येथे हे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनादिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते.
कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक आरास करून ज्याप्रमाणे गणेशपूजा केली जाते त्याचप्रमाणे येथील मंदिरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. येथील गणेशमूर्ती ही मातीची असते. गावातील गणपतीच्या चित्रशाळेमधून लक्ष्मीपूजनादिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते. त्यानंतर मंदिरातील पूजादि विधी सुरु होतात.
या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी पूजना दिवशी प्रतिष्ठापित होणारी गणेशमूर्ती ५ किंवा २१ दिवसांनी विसर्जित होत नाही. तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन हे शिमग्यामध्ये होते. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असे हे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टॅंडपासून काही मिनिटांच्याच अंतरावर आहे. त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. तसेच रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणपतीही येथून काही किलोमीटर अंतरावर आहे.