महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 10:19 IST2025-08-25T10:12:52+5:302025-08-25T10:19:03+5:30

Hartalika Vrat Puja Vidhi 2025 In Marathi: हरितालिका व्रताची सांगता कशी करावी? हरितालिका व्रताचा सोपा पूजा विधी, व्रत कथा, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

hartalika tritiya 2025 mahalaxmi yog know about hartalika vrat significance hartalika vrat puja vidhi with mantra and vrat katha in marathi | महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी

महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी

Hartalika Vrat Puja Vidhi 2025 In Marathi: अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. या दिवशी सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव शंकर आणि पार्वतीचे मनोभावे पूजन करतात. यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका व्रत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. हरितालिका व्रत पूजन कसे करावे? हरितालिका व्रताची कहाणी काय आहे? जाणून घेऊया...

हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी

हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. हरितालिका व्रत करण्यापूर्वी पूजेचे सगळे साहित्य योग्य पद्धतीने घेतले आहे ना, याची खातरजमा करावी.

हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

हरितालिका स्वर्णगौरी व्रत: २६ ऑगस्ट २०२५

भाद्रपद शुद्ध तृतीया प्रारंभ: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे. 

भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्ती: मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे.

भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत करावे, असे सांगितले जात आहे. तसेच सूर्योदयापासून ते दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांपर्यंत हे व्रत करावे. कारण त्यानंतर तृतीया तिथी समाप्त होणार आहे. 

।। अथ  हरितालिका व्रत पूजा प्रारंभः ।। 

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद, कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने दोन, त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करुन आसनावार बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या २ मूर्ति ठेवून, वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. 

- घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.

- सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी.

- चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.

- हरितालिका पूजा करताना “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”, अशी प्रार्थना करावी.

- धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहावित. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे.

- पूजा झाल्यावर  झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

हरितालिकेची कहाणी व्रत कथा

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, "महाराज, सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा." तेव्हा शंकर म्हणाले, "जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याचा पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक.' 

हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस, ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखं सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अंशी कन्या कोणास द्यावी, अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनि आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे." हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. 

नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकिकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंल, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्वय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंल. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. 

रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, "तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही," नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकिकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. त्याला हरितालिका व्रत असं म्हणतात. 

याचा विधी असा आहे : ज्या ठिकाणी है व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधाव केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूज करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. सात जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खालं. तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात. दारिद्रय येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बाण यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता 

हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरपूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्या. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपूजेच्या दिवशी करतात.

 

Web Title: hartalika tritiya 2025 mahalaxmi yog know about hartalika vrat significance hartalika vrat puja vidhi with mantra and vrat katha in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.