हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:23 IST2025-08-25T11:20:55+5:302025-08-25T11:23:44+5:30

Hartalika Vrat 2025: पार्वतीला हरितालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले? संपूर्ण देशभरात हरितालिका व्रत कसे आचरले जाते? हरितालिका व्रत कुणी करू नये? जाणून घ्या...

hartalika teej 2025 who should not do hartalika vrat know about hartalika swarna gauri vrat importance greatness in marathi | हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

Hartalika Vrat 2025: मराठी वर्षात येणाऱ्या सर्वच व्रतांना अनन्य साधारण महत्त्व असते. चातुर्मासात येणारी व्रत विशेष मानली जातात. मराठी वर्षातील प्रत्येक व्रत हे धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असतात, याशिवाय निसर्ग, शास्त्र, विज्ञान यांचीही सुरेख सांगड या व्रतांमध्ये घातलेली पाहायला मिळते. भाद्रपद महिन्यात सर्वच जण गणपती आगमनात गुंतलेले असताना, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. याला स्वर्णगौरी व्रत असेही म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव शंकर आणि पार्वतीचे मनोभावे पूजन करतात.

अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. बोली भाषेत या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात. अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा तसेच सौभाग्य सदैव राहावे, यासाठी उपवास करतात. हरतालिका हे पार्वतीचे नाव. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरतालिका हा मूळ संस्कृत शब्द आहे. हर म्हणजे हरण करणे, घेऊन जाणे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात.

हरितालिका स्वर्णगौरी व्रत: २६ ऑगस्ट २०२५

भाद्रपद शुद्ध तृतीया प्रारंभ: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे. 

भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्ती: मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे.

भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत करावे, असे सांगितले जात आहे. तसेच सूर्योदयापासून ते दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांपर्यंत हे व्रत करावे. कारण त्यानंतर तृतीया तिथी समाप्त होणार आहे. 

संपूर्ण भारतात हरितालिका व्रताचरणाचे वैविध्य

हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून मुख्यतः दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात. गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका व्रत करत नाहीत. तामिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. उत्तर भारतात, काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हरतालिका हे व्रत महिला करतात. शैव आणि शाक्त संप्रदायात हरतालिका व्रताला अधिक महत्त्व आहे. काही महिला निर्जळी उपवास करतात. उत्तर भारतात हरितालिका तीज म्हणून हे व्रत केले जाते. 

हरितालिका व्रत महाराष्ट्रात कसे केले जाते?

महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. हरितालिका व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. तसंच महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.

हरितालिका व्रत कुणी करावे?

देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केलं. तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळेच शंकरांनी तिला स्वीकारले. म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. या व्रताचा उद्देशच पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे असल्यामुळे, विवाहित स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उचित मानले जाते. कुमारिका हे व्रत करू शकतात. देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा, या इच्छेने त्या हे व्रत करत असतात. ज्या स्त्रिया अध्यात्मिक श्रद्धेने शंकर-पार्वतीची पूजा करतात, त्या वय किंवा वैवाहिक स्थितीची अट न बाळगता हे व्रत करू शकतात, असे म्हटले जाते.

हरितालिका व्रत कुणी करू नये?

- या दिवशी उपवास खूप कठोर असतो. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करावे किंवा वर्ज्य करावे.

- आजारी किंवा गंभीर आजारांवरील औषधे सुरू असलेल्या महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भाविकतेने दिवस साजरा करावा.

- ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करता येत नाही, त्यांनी उपवास न करता, फलाहार करून किंवा मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे.

 

Web Title: hartalika teej 2025 who should not do hartalika vrat know about hartalika swarna gauri vrat importance greatness in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.