Ganesh Chaturthi 2022: मुंबईचा सिद्धिविनायक आणि श्री स्वामी समर्थांचे आहे अद्भूत नाते; वाचा, मंदार वृक्षाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:15 AM2022-08-27T10:15:08+5:302022-08-27T10:16:25+5:30

Ganesh Chaturthi 2022: मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराला स्वामी समर्थ महाराजांचे शुभाशीर्वचन लाभलेत, असे सांगितल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भातील एक कथा सांगितली जाते. जाणून घ्या...

ganesh chaturthi 2022 unknown but amazing story of shree siddhivinayak ganpati mandir and shree swami samarth maharaj | Ganesh Chaturthi 2022: मुंबईचा सिद्धिविनायक आणि श्री स्वामी समर्थांचे आहे अद्भूत नाते; वाचा, मंदार वृक्षाची कथा

Ganesh Chaturthi 2022: मुंबईचा सिद्धिविनायक आणि श्री स्वामी समर्थांचे आहे अद्भूत नाते; वाचा, मंदार वृक्षाची कथा

googlenewsNext

चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. भाद्रपद म्हटला की, आठवते ते फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचे आगमन. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. यंदाच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या गणेशोत्सवाच्या काळातही विविध गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले जाते.  (Ganesh Chaturthi 2022)

मुंबईकरांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादरचे सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही, असे होणार नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंबईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला? नेमकी घटना आणि स्वामी समर्थांची लीला कोणती? जाणून घेऊया... (Shree Siddhivinayak Ganpati and Shree Swami Samarth)

माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते. तिच्यावर प्रेम करते, श्रद्धा आणि विश्वास ठेवते. अगदी तसेच नाते स्वामी महाराज आणि जांभेकर महाराजांचे होते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे?, अशी विचारणा स्वामींनी केली. प्रत्यक्ष ब्रह्मांडाला आपल्या हातात गोटीसमान धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या.

मंगळवारी मंदार वृक्षाचे रोपटे लाव

रामकृष्णबुवांची इच्छा ऐकून स्वामींना अतिशय आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता इष्ट देवतेसाठी मागितले. मंदिराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्तगण वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना खूपच आवडली. स्वामींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तुझा हा मंदार इंचाइंचाने वाढेल, तसे तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी तो मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले.

भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत; सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना

रामकृष्णबुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना त्यांनी केली. हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व तुझ्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असे आशीर्वचन रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले.

स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला, तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची पूर्ण केली. स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले, अशी एक कथा सांगितली जाते.
 

Web Title: ganesh chaturthi 2022 unknown but amazing story of shree siddhivinayak ganpati mandir and shree swami samarth maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.