अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:19 IST2025-09-05T11:17:10+5:302025-09-05T11:19:20+5:30
Anant Chaturdashi 2025 Ganpati Visarjan Shubh Muhurat: राहु काळ कधी आहे? यंदा २०२५ च्या अनंत चतुर्दशीला मृत्यू पंचक आहे. गणपती विसर्जनासाठी दिवसभर शुभ मुहूर्त सांगितले आहेत. जाणून घ्या...

अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
Anant Chaturdashi 2025 Ganpati Visarjan Shubh Muhurat: ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपती बाप्पांना या दिवशी निरोप दिला जातो. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपतीचे विसर्जन करताना घरातील वातावरण अगदी भावपूर्ण झालेले असते. गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा किंवा अगदी दहा दिवसाचा गणपती असला, तरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते. यंदा २०२५ च्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी दिवसभर कोणते शुभ मुहूर्त आहेत, ते जाणून घेऊया...
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
यंदा, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीची सुरुवात होत आहे. तर, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ४१ मिनिटांनी अनंत चतुर्दशी समाप्त होईल. परंतु, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. या दिवशी राहु काळ सकाळी ०९ ते १०.३० या कालावधीत आहे.
अनंत चतुर्दशी २०२५ गणपती विसर्जन शुभ मुहूर्त
- शुभ चौघडिया मुहूर्त: सकाळी ७ वाजून २६ मिनिटे ते ९ पर्यंत.
- अमृत काळ: दुपारी १२ वाजून ५० ते २ वाजून २३ मिनिटे.
- लाभ चौघडिया मुहूर्त: दुपारी १ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून २८ मिनिटे.
- अमृत चौघडिया मुहूर्त: दुपारी ३ वाजून २८ मिनिटे ते सायंकाळी ५ वाजून ०३ मिनिटे.
- सायंकाळी गोधूलि मुहूर्त: ६ वाजून ३७ मिनिटे ते ७ वाजता.
- सायंकाळी लाभ चौघडिया मुहूर्त: ७ वाजता ते ८ वाजून ०३ मिनिटे.
- सायंकाळी शुभ चौघडिया मुहूर्त: रात्रौ ९ वाजून २९ मिनिटे ते १० वाजून ५५ मिनिटे.
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
अनंत चतुर्दशी २०२५ गणपतीला निरोप देताना नामस्मरण अवश्य करा
बाप्पाची यथासांग पूजा करून त्याला प्रिय लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा. बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सान्निध्यात काही काळ शांत बसून 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर पुढील मंत्र म्हणत बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा.
- ॐ गणाधिपाय नम:
- ॐ उमापुत्राय नम:
- ॐ विघ्ननाशनाय नम:
- ॐ विनायकाय नम:
- ॐ ईशपुत्राय नम:
- ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
- ॐ एकदन्ताय नम:
- ॐ इभवक्त्राय नम:
- ॐ मूषकवाहनाय नम:
- ॐ कुमारगुरवे नम:
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!