बीडमध्ये तिरंगी लढतीत अण्णांची गुगली; जयदत्त क्षीरसागरांच्या एंट्रीने काका-पुतण्यात पुन्हा संघर्ष!
By सोमनाथ खताळ | Updated: November 26, 2025 15:19 IST2025-11-26T15:13:01+5:302025-11-26T15:19:17+5:30
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पालिकेच्या निवडणुकीत उडी घेत भाजप उमेदवाराचा प्रचार केला सुरू

बीडमध्ये तिरंगी लढतीत अण्णांची गुगली; जयदत्त क्षीरसागरांच्या एंट्रीने काका-पुतण्यात पुन्हा संघर्ष!
बीड : बीड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा एका पुतण्याला पाठिंबा देत दुसऱ्याला विरोध केला आहे. यामुळे क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. राजकारणाचा अनुभव असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच बीड पालिका निवडणुकीसाठी बैठक घेत भाजप उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांचे राजकीय स्थान स्पष्ट झाले आहे.
विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आ. संदीप क्षीरसागर यांना विरोध करत डॉ. योगेश क्षीरसागर यांना साथ दिली होती. आताही त्यांनी त्यांनाच पाठिंबा देत भाजपसोबत भूमिका घेतली आहे. डॉ. योगेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ऐनवेळी पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडत भाजपात प्रवेश केला. यामुळे बीड पालिकेतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेतृत्व पहिल्यांदाच पंडित बंधूंकडे (माजी आ. अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित) आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांच्या एन्ट्रीने आणखीन रंगत येणार आहे.
तिरंगी लढत अन् अण्णांची गुगली
बीड पालिकेवर आतापर्यंत क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे आमदार संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) हे आपल्या उमेदवारांसाठी मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यादेखील भाजपकडून उमेदवारांसाठी धावपळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर, जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच गेवराईतील भाजपच्या उमेदवार गीता पवार यांचे पती बाळराजे पवार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांची भेट घेत राजकीय गुगली टाकली. आता भाजप (योगेश क्षीरसागर / जयदत्त समर्थक), राष्ट्रवादी (अजित पवार गट / पंडित बंधू) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट / संदीप क्षीरसागर) अशी तिरंगी लढत बीडमध्ये अधिक तीव्र झाली आहे.
संदीप क्षीरसागरांना पुन्हा विरोध
संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून राजकीय मतभेदामुळे वेगळे झाले. त्यांनीच विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत त्यांनी भाऊ डॉ. योगेश यांच्यावर निसटता विजय मिळवला. तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी डाॅ. योगेश यांना पाठिंबा दिला होता. परंतु, विजय मिळवता आला नाही. आतादेखील त्यांनी डॉ. योगेश यांच्याच पाठीमागे उभे राहात भाजपचा प्रचार सुरू केला आहे. संदीप क्षीरसागर हे त्यांचे राजकीय विरोधक कायम असल्याचे दिसते.