अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड...
By प्रविण मरगळे | Updated: October 2, 2022 16:53 IST2022-10-02T16:00:39+5:302022-10-02T16:53:01+5:30
फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील डॉ. अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव: जागतिक स्तरावर होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वचषक २०२२ या स्पर्धेत इमरजन्सी मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी डॉ.अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे. इमरजन्सी मेडिसिन स्पेशालिस्ट म्हणून निवड होणारे महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर आहेत.
डॉ.अविनाश प्रभाकर कचरे, हे मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेगावचे भूमिपुत्र. विळदघाट येथील डॉ. विखेपाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तसेच केरळ राज्यातील तिरुअनंतपूरम येथील अनांथापुरी हॉस्पिटल येथून डी.एन.बी.इमरजन्सी मेडिसिनचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या पुणे येथील नोबल रुग्णालयात अतिदक्षता व अपघात विभाग प्रमुख काम पहात आहेत.
डॉ. कचरे यांची कतार देशात २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकात निवड झाली आहे. या विश्वचषकात येणाऱ्या खेळाडूंवर डॉक्टर कचरे हे उपचार करू शकणार आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. केंद्रिीय अर्थमंत्री राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनीही त्यांना अभिनंदन केले.
कतार देशातील शासकीय रुग्णालय असलेल्या हमात हॉस्पिटल हेल्थ कॉर्पोरेशन यांनी पाच वेळा माझी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर माझी एक महिन्यापूर्वी इमरजन्सी मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून निवड झाली. त्यामुळे मी ५ ऑक्टोबर ते २० डिसेंबर पर्यंत या ठिकाणी होणाऱ्या फुटबॉल मॅच मध्ये सहभागी होणार आहे.- डॉ.अविनाश प्रभाकर कचरे.