मुंडे परिवाराचे जुळले, ठाकरे, पवारांची जवळीक; आता बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?
By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2025 19:02 IST2025-12-25T19:01:03+5:302025-12-25T19:02:53+5:30
सत्तेसाठी नात्यांची गणिते जुळवण्याची आता बीडमध्ये क्षीरसागरांना संधी

मुंडे परिवाराचे जुळले, ठाकरे, पवारांची जवळीक; आता बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?
बीड : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निकालांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी दिली आहे. एका बाजुला नगरपालिकांमध्ये बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू असताना, दुसऱ्या बाजुला आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या राजकीय परिवारांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या राजकारणात परळीतील मुंडे परिवार आधीच एकत्र आला असून, आता ठाकरे आणि पवार परिवारानंतर बीडच्या क्षीरसागर परिवारातही मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांमधील जवळीक वाढताना दिसत आहे. उध्दवसेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका - पुतण्या महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कौटुंबीक जवळीक आणि राजकीय निकड यामुळे ही दोन कुटुंब पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसू शकतात. राजकारणातील कट्टर शत्रुत्व बाजूला ठेवून आता 'नात्यांच्या गणितांनी' सत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत.
बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?
बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर परिवाराचे मोठे वलय आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून हा परिवार राजकीयदृष्ट्या विभागलेला आहे. परळीत ज्याप्रमाणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी 'महायुती'च्या माध्यमातून एकत्र येऊन सत्ता काबीज केली, तोच फॉर्म्युला बीडमध्ये राबवण्याची संधी आता चालून आली आहे.
बहुमतासाठी क्षीरसागर बंधूंना हवे एकमेकांचे सहकार्य
बीड नगरपालिकेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार - विजयसिंह पंडित गट), भाजप (योगेश क्षीरसागर गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार - संदीप क्षीरसागर गट) यांच्या जागांची गोळाबेरीज पाहता, बहुमतासाठी एकमेकांचे सहकार्य घेणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सत्तेसाठी आणि शहराच्या विकासासाठी दोन्ही क्षीरसागर बंधूंना (संदीप आणि योगेश क्षीरसागर) एकत्र येण्याची ऐतिहासिक संधी आहे. हे मनोमिलन झाले, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये बीडमध्ये पुन्हा एकदा 'क्षीरसागर' ब्रँडचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.
गेवराईचा पंडित परिवार विभागलेलाच
गेवराईत उद्धवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बदामराव पंडित आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे आ. विजयसिंह पंडित व माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यात अद्याप मनोमिलन झालेले नाही. गेवराई नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली असून, येथे पंडित गटाचा दारूण पराभव झाला आहे. बदामराव पंडित हे अमरसिंह आणि विजयसिंह यांचे नात्याने काका आहेत. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता येथे या कुटुंबाचे मनोमिलन होणे कठीण असल्याचे दिसते.