भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:14 IST2019-10-19T00:13:23+5:302019-10-19T00:14:07+5:30
भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पंकजाताई काम करत आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस इथे येऊन बसली तरी पंकजातार्इंचा विजय कुणी रोखू शकत नाही. भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
शुक्रवारी गणेशपार येथील प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री महादेव जानकर, डॉ. अमति पालवे,खा. डॉ प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे, प्रा. टी पी मुंडे, राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी आ. विजय गव्हाणे, अक्षय मुंदडा, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, व्यंकटेश शिंदे, राजेश विभूते, भास्कर रोडे, उत्तम माने, सुधाकर पौळ, सुरेश माने, वृक्षराज निर्मळ, बालासाहेब कराळे, भरत सोनवणे, संतोष सोळंके उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, मुंडे साहेबांनी लोक जोडण्याचं काम केलं. माझ्या वडिलांचे माझ्यावरचं छत्र हरपले, त्यावेळी मुंडे साहेबांनी वडीलांच छत्र माझ्यावर धरलं. मी वाट चुकलो असं कोणीतरी म्हणालं. पण मी सांगतो, आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. आता मुंडे साहेबांचं स्वप्नं पुर्ण करण्याचं काम माझ्या दोन्ही भगिनी करीत आहेत. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम होत आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्याचं काम मोदी साहेब मराठवाडा वॉटरग्रीडच्या माध्यमातून करीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीकडे १५ वर्षे सत्ता होती. या काळात त्यांनी काय विकास केला? केवळ जातीजातीत भांडणं लावण्याचं काम केलं आहे. आमच्या भागातील कृष्णा खोरे योजनाही स्व.मुंडे साहेबांनी मार्गी लावली. मराठा आरक्षण देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले.त्यासाठी महायुतीच्या पाठीमागे उभा राहून माझ्या बहिणीला तुम्ही निवडून द्या, असे आवाहनही उदयनराजेंनी केले.