Dhananjay Munde got the dialogue with the people | धनंजय मुंडेंना जनतेशी असलेला संवाद आला कामी
धनंजय मुंडेंना जनतेशी असलेला संवाद आला कामी

ठळक मुद्देसहा महिने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा; दौंड यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मेहनत

परळी : शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले. परळी मतदार संघातील ग्रामीण भागातून मताधिक्क्य तर मिळालेच परंतु शहरातूूनही मताधिक्क्य मिळाल्याने धनंजय मुंडे यांचा मोठा विजय झाला.
परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणात एप्रिल महिन्यापासूनच पाणीसाठा कमी झाला. अल्प पाणीसाठा असताना ५ दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करावा लागला. त्यानंतर धरण कोरडेठाक झाले व पाणी टंचाईची तीव्रता वाढली. कधी नव्हे एवढी यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई परळीत जाणवली. अशा अडचणीच्या काळात पाण्यासाठी परळीकरांची तारांबळ न होवू देता धनंजय मुंडे यांनी आपल्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली व या सुचनेचे तंतोतंत पालन झाले. प्रत्येक गल्लीत नगर परिषदेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शिवाय नाथ प्रतिष्ठानने ही या कामी मदत केली. शहरात पाणीपुरवठा करण्यात राष्ट्रवादी पुढे राहिल्याने मतदारांनीही भाजप पेक्षा राष्ट्रवादीला जास्त मते देवून पुढे नेले. पाणी पुरविणे हे पवित्र काम असल्याने नागरिकांनी धनंजय मुंडे यांना निवडणुकीत मदत केली.
धनंजय मुंडे यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असल्याने व समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पाच वर्ष काम केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना यश प्राप्त करता आले. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील अनेक गावात जाहिर सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेवून संवाद साधला होता. हा संवादही धनंजय मुंडे यांच्या कामाला आला. राष्ट्रवादी काँग़्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड, संजय दौंड व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीव तोडून मेहनत घेतली. तसेच धनंजय मुंडे यांचीही विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली.
विजयाची तीन कारणे...
1परळी नगर परिषद राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. शहरात पाणीटंचाईच्या काळात नगर परिषदेने ६ महिने पाणीपुरवठा केला.
2कार्यकर्त्यांची मजबूत फळी, माजी मंत्री पंडितराव दौंड तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले.
3पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा होऊनही मतांवर परिणाम झाला नाही. उलट धनंजय मुंडे यांनी स्वत: मतदार संघाची खिंड लढविली.

Web Title: Dhananjay Munde got the dialogue with the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.