Refusal to treat Corona victims at Devpul! | देवपुळ येथील कोरोना बाधितांचा उपचारास नकार !

देवपुळ येथील कोरोना बाधितांचा उपचारास नकार !

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील देवपुळ येथील अतिजोखमीच्या ३ कोरोनाबाधित रूग्णांसह १० जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती होण्यास नकार देवून उपचार घेण्यास तयार नाहीत.

या रूग्णांमुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढला आहे. देवपुळ गावातील एक जण पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ३५ व्यक्तींच्या दि. २५ सप्टेंबर रोजी अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन रूग्ण गावातच आहेत.

ते उपचारासही येण्यास तयार नाहीत. त्यांच्यामुळे गावात मोठा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कडक निर्बंध ठेवण्याच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र ग्रामसेवक जी. डी. चव्हाण यांनी पिशोर पोलीस ठाण्यात दिले. मात्र त्या पत्रावर ठाणे अंमलदाराने पोहोच देण्यास नकार दिला.

अतिजोखमीच्या ४ रुग्णांपैकी एक जण खाजगी दवाखान्यात भरती झाला असुन उर्वरित ३ जण रुग्णवाहिकेमध्ये न बसता फरार झाले आहेत, असे पत्र करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीसांना दिले आहे.

 तालुका आरोग्याधिकारी डॉ. बाळकृष्ण लांजेवार यांनी सांगीतले की, इतर आजार नसलेल्या व लक्षणे नसलेल्या ५५ वर्ष वयापर्यंतच्या बाधितांना होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) मध्ये ठेवता येते मात्र ५५ वर्षांवरील बाधित व्यक्ती अतिजोखमी प्रकारात मोडत असल्याने त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Refusal to treat Corona victims at Devpul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.