Maharashtra Election 2019 : Whose victory will public opinion enrich? | Maharashtra Election 2019 :जनमताचा कौल कुणाचे पारडे समृद्ध करणार?
Maharashtra Election 2019 :जनमताचा कौल कुणाचे पारडे समृद्ध करणार?

ठळक मुद्देफुलंब्री येथून हरिभाऊ बागडे आठव्यांदा पैठण मधून संदीपान भुमरे सहाव्यांदाअब्दुल सत्तार, हर्षवर्धन, जैस्वाल चौथ्यांदा कल्याण काळे, संजय शिरसाट, प्रशांत बंब तिसऱ्यांदा जनतेच्या दरबारी

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : महाराष्ट्रात सोमवारी १३ व्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून १३३ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम यंत्रात बंद झाले. चर्चेतील चेहऱ्यांपैकी भाजपचे फुलंब्री मतदारसंघातील उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी सर्वाधिक आठव्यांदा जनमताचा कौल मागितला. त्यांच्यापाठोपाठ पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे तब्बल सहाव्यांदा मतदारांसमोर गेले. 

जिल्ह्यात १२ दिवस प्रचाराची रणधुमाळी उडाली. विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांसह राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी मते मागितली. शनिवारी सायंकाळी प्रचार समाप्त झाल्यानंतर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीची रणनीती आखली गेली. यासाठी सर्वच उमेदवारांचे रणनीतीकार कामाला लागले होते. याचा सर्वाधिक अनुभव आहे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना. बागडे नाना १९८५ मध्ये पहिल्यांदा जनसंघाच्या तिकिटावर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून लढले व विजयी झाले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते भाजपतर्फे सतत तीनदा विजयी झाले. २००४ व २००९ मध्ये काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी काळे यांना मात दिली. यंदा बागडे व काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे पुन्हा आमनेसामने होते. फुलंब्रीतील ही लढत तुल्यबळ मानली जात आहे. 

पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे सतत सहाव्यांदा मतदारांसमोर गेले. १९९५ मध्ये पहिल्यांदाच भुमरे लढले व विजयी झाले. विजयाची हॅट्ट्रिक साधणाऱ्या भुमरे यांना २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांनी पराभूत केले होते. २०१४ मध्ये भुमरे यांनी पराभवाचे उट्टे काढत पुन्हा विजयश्री खेचून आणली. यंदा त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता गोर्डे यांच्या रुपाने नवीन चेहरा समोर आणला होता. मतदारांनी कुणाला पसंती दिली ते गुरूवारी समजेल.  

हर्षवर्धन, जैस्वाल, सत्तार व राजपूत यांचा निवडणुकीचा चौकार
कन्नड मतदारसंघातून गतवेळेस शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेले हर्षवर्धन जाधव यंदा अपक्ष लढले. या मतदारसंघातून त्यांनी चौथ्यांदा जनादेश मागीतला. २००४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच हर्षवर्धन जाधव व उदयसिंह राजपूत हे दोघेही अपक्ष प्रतिस्पर्धी होते. दोघेही पराभूत झाले व शिवसेनेचे नामदेव पवार विजयी झाले होते. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये जाधव व राजपूत एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. २००९ मध्ये मनसेच्या आणि २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर जाधव सलग दोनदा आमदार झाले. यंदा जाधव अपक्ष, तर राजपूत शिवसेनेतर्फे लढले. कन्नड मतदारसंघावर १९९० पासून जाधव परिवाराचा पगडा असून, कुटुंबाचा सदस्य या मतदारसंघात सतत उमेदवारी करतो आहे. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांनी काँग्रेसतर्फे १९९० व १९९५ मध्ये आमदारकी भूषविली. १९९९ मध्ये हर्षवर्धनच्या आई तेजस्विनी जाधव  लढल्या; परंतु निसटत्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. राष्ट्रवादीने यंदा संतोष कोल्हे व वंचित बहुजन आघाडीने महादू राठोड हे नवे चेहरे दिले आहेत. कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. 

सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे सतत चौथ्यांदा जनमताचा कौल मागत आहेत. २००४ मध्ये त्यांनी प्रथम या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २००९ व २०१४ मध्ये ते काँग्रेसतर्फे विधानसभा सदस्य झाले. यंदा ते शिवसेनेकडून मैदानात उतरले. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यंदा दुसऱ्यांदा जनतेसमोर येत आहेत. १९९९ मध्ये याच मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली व पराभूत झाले. यंदा पालोदकरांना सर्वच जातीधर्मातील मतदारांनी पाठिंबा दिल्याचे दिसले. 

औरंगाबाद मध्य मतदारसंघातून लढणारे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचीही विधानसभेची चौथी निवडणूक आहे. या मतदारसंघातून ते २००९ मध्ये विजयी झाले तर २०१४ मध्ये पराभूत. तत्पूर्वी २००४ मध्ये औरंगाबाद  पश्चिम मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांनी त्यांचा पराभव केला होता. यंदा त्यांच्यासमोर एमआयएमचे नासेर सिद्दीकी, भाकपचे तरुण उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ हे नवे चेहरे आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, एनसीपीचे कदीर मौलाना, शेकापचे चेतन कांबळे हे दुसऱ्यांदा विधानसभेसाठी जनमताचा पाठिंबा अजमावत आहेत. प्रत्यक्ष मतदान जैस्वाल यांच्या बाजुने झुकलेले दिसले. 

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत बंब आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट हे  यंदा हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत दिसत आहेत.  बंब हे २००९ मध्ये प्रथम अपक्ष व २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते. तर शिरसाट २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पश्चिम मतदार संघातून संजय शिरसाठ व भाजपा बंडखोर राजू शिंदे यांची मतदान घेतांना रस्सीखेच दिसली. अनेक मतदान केंद्रावर भाजपाचे कार्यकर्ते गळ्यात गमचा घालून शिंदे यांचे काम करत होते. एमआयएमचे अरुण बोर्डे यांना मुस्लिमांनी भरभरून मतदान केल्याचे दिसले. 

राज्यमंत्री अतुल सावेंचा दुसरा डाव
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विद्यमान राज्यमंत्री अतुल सावे दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर भाग्य अजमावत आहेत. याच मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. गफार कादरी यांच्याशी त्यांची सलग दुसऱ्यांदा लढत होत आहे. या मतदारसंघात धर्माच्या आधारावर मतदारात विभाजन झाल्याचे चित्र दिसत होते.  या रोमहर्षक लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. 

प्रभावी बंडखोर राजू शिंदेसह अनेक नवे चेहरे
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांच्यासह जिल्ह्यात यंदा अनेक नवे चेहरे मैदानात आहेत. त्यात अभय पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी, वैजापूर), प्रा. रमेश बोरनारे (शिवसेना, वैजापूर), संतोष माने (राष्ट्रवादी, गंगापूर), संतोष कोल्हे (राष्ट्रवादी, कन्नड), दत्ता गोर्डे (राष्ट्रवादी, पैठण), संदीप शिरसाट (वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद पश्चिम), अ‍ॅड. अभय टाकसाळ (भाकप, औरंगाबाद मध्य), विजय चव्हाण (वंचित बहुजन आघाडी, पैठण) यांचा समावेश आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Whose victory will public opinion enrich?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.