Maharashtra Election 2019 : Supporters of MIM candidates Siddiqui and Qureshi flocked | Maharashtra Election 2019 : एमआयएमचे उमेदवार सिद्दीकी आणि कुरैशी यांचे समर्थक भिडले

Maharashtra Election 2019 : एमआयएमचे उमेदवार सिद्दीकी आणि कुरैशी यांचे समर्थक भिडले

ठळक मुद्दे एमआयएमच्या उमेदवाराला या भागात प्रचार रॅली काढू नका असा दम भरला.

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी शनिवारी दुपारी ४ वाजता पैठणगेट येथून पदयात्रेला सुरुवात करताच एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. कार्यकर्ते आपसात काही वेळ भिडले. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच  एमआयएमच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

एमआयएमने नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्यापासून पक्षात अंतर्गत कलह कमालीचा वाढला आहे. माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांचा पत्ता कट करून सिद्दीकी यांची ऐनवेळी वर्णी लावण्यात आली. त्यामुळे कुरैशी समर्थक कमालीचे नाराज आहेत. कुरैशी यांनी पक्षाच्याच उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी अर्जही भरला होता. धर्मगुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर एमआयएमचे नगरसेवक जहांगीर खान ऊर्फ अज्जू पहिलवान यांनी नासेर सिद्दीकी यांच्या रॅलीला काळे झेंडे दाखवून दोन दिवसांपूर्वीच खळबळ उडवून दिली होती. शहरातील विविध भागांत नागरिक, तरुणांनीही नासेर सिद्दीकी यांना प्रचार करू नये म्हणून परत पाठवून दिले.

शनिवारी दुपारी ४ वाजता पैठणगेट येथून त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला सुरुवात होताच जावेद कुरैशी समर्थक तरुण तेथे दाखल झाले. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराला या भागात प्रचार रॅली काढू नका असा दम भरला. त्यावेळी एमआयएम आणि कुरैशी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. एमआयएमचे झेंडे फाडण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अंगावरही काही जण धावून गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. या घटनेनंतर पैठणगेट भागात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: Maharashtra Election 2019 : Supporters of MIM candidates Siddiqui and Qureshi flocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.