Maharashtra Election 2019 : 'management' of candidates for bringing out voters from outside the city | Maharashtra Election 2019 : प्रचारानंतर आता शहराबाहेरील मतदारांना आणण्याची उमेदवारांची ‘व्यूहरचना’
Maharashtra Election 2019 : प्रचारानंतर आता शहराबाहेरील मतदारांना आणण्याची उमेदवारांची ‘व्यूहरचना’

ठळक मुद्दे २०० ते ४०० किमीवरून येणार मतदार शनिवार, रविवार मतदानासाठी प्रवास

औरंगाबाद : मतदानाचा दिवस अवघ्या तीन दिवसांवर आला असून, मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नोकरी अथवा कामानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांना दोनशे ते चारशे किलोमीटर लांबून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  

नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. एक-एक मतदान विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरते. गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघातील वॉर्डावॉर्डांमध्ये कार्यकर्त्यांकडून शहराबाहेर असलेल्या मतदारांचा आढावा घेण्यात येत आहे. अशा मतदारांची यादी बनविली जात आहे. मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधून मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांचीही मदत घेतली आहे. 

मतदानासाठी येण्यास प्रवास भाडे देण्याची योजना अनेकांकडून आखण्यात आली आहे, तर अनेकांनी चार ते सहा मतदारांना एकाच वेळी आणण्यासाठी खाजगी वाहनांचे नियोजन केले आहे. तसेच विविध शहरांतून औरंगाबादेत राहाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. असे मतदारही मतदानासाठी औरंगाबादहून रवाना होतील. त्यामुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मतदानासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची म्हणजे मतदारांची संख्या सर्वाधिक राहील, असे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुण्याहून सर्वाधिक मतदार
औरंगाबादहून नोकरी, शिक्षणासाठी पुण्याला राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दर सुटीमुळे शनिवारी, रविवारी पुण्याहून औरंगाबादला येण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दोन दिवशी एसटी महामंडळाच्या पुणे मार्गावरील बस फुल असतात. ४सोमवारी मतदानाचा दिवस असल्याने औरंगाबादला येणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी असलेल्या मतदारांना शहरात आणण्याचे नियोजन कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. 

५० हजारांवर मतदार
शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त ५० हजारांवर मतदार शहराबाहेर असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मतदानाच्या दिवसापूर्वी त्यांना शहरात आणून त्यांचे मत आपल्या उमेदवाराच्या पदरात पाडून घेण्यासाठी कार्यकर्ते काम करीत आहेत. 

Web Title: Maharashtra Election 2019 : 'management' of candidates for bringing out voters from outside the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.