Maharashtra Election 2019 : Aurangabad Central: The fate of 3 candidates closed in EVM machine | Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

ठळक मुद्देसरासरी ६० टक्के मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मतदारसंघातील ३२४ पैकी सहा मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बंद पडण्याच्या घटना घटल्या. त्यामुळे अर्धा तास मतदारांना वाट पाहावी लागली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह पाहायला मिळाला. दुपारी १ वाजेनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. हर्सूल गावातील कोलठाणवाडी रोडवरील एकनाथ विद्यामंदिरात मतदान केंद्र होते. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला. तब्बल एक किलोमीटर चिखल तुडवत मतदारांना ये-जा करावी लागत होती, तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. 
हर्सूलमधील मनपाच्या शाळेतील चारही केंद्रांवर लांबचलांब रागा होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले होते.

मध्य मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील चार आणि टप्पा क्रमांक तीनमधील इमारतीतील चार अशा आठ मतदान केंद्रांवर दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते. मध्य मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. नवीन व्हिलचेअरमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन जात होते. शहरातील विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी थोड्या थोड्या वेळाने पोलिसांकडे प्राप्त होत्या. आमखास मैदानावरील सिटी क्लब येथील मतदान केंद्रावर अर्धा तास याच वादावरून मतदान थांबविण्यात आले होते.

सखी मतदान केंद्र 
मध्य मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्रे होती. एम.पी. लॉ कॉलेज आणि छावणीतील पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. एमपी लॉ कॉलेजमध्ये सखी मतदान केंद्रावर दुपारी ४ वाजेपर्यंत ८९१ मतदारांपैकी ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

औरंगाबाद मध्यमध्ये असा वाढला मतदानाचा टक्का
सकाळी ७ ते ९ वाजता    :    ६.४८ टक्के
सकाळी ९ ते ११ वाजता    :    १७.५८  टक्के
दुपारी ११ ते १ वाजता    :    ३१.१५ टक्के
 दुपारी १ ते ३ वाजता    :    ४३.२२ टक्के
 सायंकाळी ३ ते ५ वाजता    :    ५४.८७ टक्के 
सायंकाळी ५ ते ६ वाजता    :    ५९.५० टक्के
 

Web Title: Maharashtra Election 2019 : Aurangabad Central: The fate of 3 candidates closed in EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.