September Birthday Astro: ध्येयाने झपाटून काम कसे करावे, ते सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांकडून शिकावे!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-30 17:16:49 | Updated: August 30, 2022 17:16 IST

September born babies: जन्माला आलेल्या व्यक्तींवर राशीचा, ग्रहाचा, संबंधित महिन्याचा प्रभाव दिसून येतो. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यातील जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुण!

Open in app

सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेले लोक ध्येयाने झपाटलेले असतात. त्यांच्यात गुण आणि दोष समसमान असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांच्या तुलनेत अतिशय संतुलित असते! 

हे लोक स्वत:च्या प्रचंड प्रेमात असतात. त्यांच्याबद्दल दुसऱ्याने काही टीका केलेली त्यांना सहन होत नाही. अतिशय शिघ्रकोपी अशी यांची ओळख आहे, परंतु ते नेहमी या भ्रमात असतात, की आपल्यापेक्षा शांत आणि विनम्र दुसरे कोणीच नाही. टोमणे मारण्यातही ते पुढे असतात. 

यांच्यात शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते. कामाच्या बाबतीत ते तहानभूक विसरून मान पाठ एक करतात. दिवसाचे चोवीस तास काम करण्याची त्यांची तयारी असते. एवढी ऊर्जाही त्यांच्याजवळ असते. त्यांच्या या गुणाचे इतरांनी कौतुक करावे असे त्यांना नेहमी वाटत राहते.  या स्वभावामुळे त्यांची खोटी प्रशंसा करून लोक आपले काम काढून घेतात आणि यांना ते कळतही नाही. 

शर्यत कोणतीही असो, त्यात स्वत:ला अग्रेसर कसे ठेवायचे हे यांच्याकडून शिकावे. कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी ते स्वार्थीदेखील होतात. दुसऱ्यांकडून आपले काम काढून घेण्यासाठी वाट्टेल तेवढे गोड बोलतील. प्रेमातही त्यांचा अहंकार आडवा येतो. 

त्यांच्या मनात काय सुरू असते हे त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनाही समजू शकत नाही. एवढी गोपनियता ठेवण्यात ते तरबेज असतात. मात्र जवळच्या माणसांकडून त्यांच्या भरमसाठ अपेक्षा असतात. 

वृत्तीने दानशूर असतात आणि व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात. कोणाला काही दिले तर व्याजासकट परत घेतात. नीटनेटके राहणीमान त्यांना आवडते. 

करिअर आणि प्रेम यापैकी त्यांच्या वाट्याला काहीतरी एक परिपूर्ण येते. प्रेम, वैवाहिक जीवन सुखाचे असेल तर करिअर मध्ये फारसे यश मिळत नाही आणि करिअरमध्ये अग्रेसर असले, तर वैवाहिक जीवनात फार आनंद घेता येत नाही. त्यामुळेच की काय हे लोक असंतुष्ट असतात. नवीन गोष्टी मिळाल्या नाहीत की ते नाराज असतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक गायन, वादन, लेखन, विज्ञान या क्षेत्रात करिअर करताना आढळतात.

या महिन्यात जन्मलेल्या मुलींबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडतील. अर्थात हे कौतुकाने नाही, तर गमतीने म्हटले आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वत:ला सर्वज्ञ समजतात. याच इगो प्रॉब्लेममुळे प्रेमाच्या तसेच वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अपयशी ठरतात. एखाद्याच्या पाठीमागे त्याची उणीदुणी काढणे हा त्यांचा आवडता छंद असतो. अशा मुलींकडे प्रतिभा असूनही केवळ अहंकारामुळे त्यांच्या गुणांची कदर होत नाही. 

त्या दिसायला सुंदर असतात परंतु स्वभावाने वाईट असतात. अर्थात त्यातही अपवाद आहेच! काही जणी अतिशय भोळ्या भाबड्या, तर काही जणी अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या असतात.व्यक्तिची पारख करण्यात त्या चुकतात, त्यामुळे चुकीच्या व्यक्तिची निवड करून पश्चात्ताप सहन करतात. 

एकूणच काय, तर या महिन्यात जन्मलेले स्त्री असो वा पुरुष, यांनी आपला इगो बाजूला ठेवून जाणकारांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि शर्यतीत टिकून राहण्यासाठी नाही, तर स्वत:ला आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग करिअर असो नाहीतर कुटुंब, तुम्ही कायम आनंदी राहू शकाल. 

त्यासाठी या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींचा आदर्श तुम्ही ठेवू शकाल. या नामांकित लोकांनी आपल्या दुर्गुणांवर मात करून यश मिळवले, तसे तुम्हालाही मिळवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, लता मंगेशकर, आशा भोसले, अक्षय कुमार, सुखविंदर सिंग ही काही आदर्श उदाहरणे समोर ठेवता येतील...!

टॅग्स :फलज्योतिष
Open in App