Astrology Tips: पायात काळा धागा बांधल्याने कुंडलीतील राहू केतू दोष दूर होतो की हा अंधश्रद्धेचा भाग म्हणावा? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-02-02 18:20:46 | Updated: February 2, 2023 18:20 IST

Astrology Tips: कुंडलीतील राहू केतू दोष यशात अडथळे निर्माण करतो, त्यावर काळा धागा बांधण्याचा उपाय प्रभावी ठरतो का? ज्योतिष शास्त्राचे मत जाणून घेऊ. 

Open in app

बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातापायांना काळा दोरा तर कमरेला करगोटा बांधतात हे आपल्याला माहीत आहेच, मात्र अनेक मोठ्या माणसांच्या पायातही काळा धागा बांधलेला दिसतो. काही मुली तर फॅशन म्हणूनही तो धागा बांधतात, तर काही जण दृष्ट लागू नये म्हणून! मात्र याला शास्त्राधार आहे का? त्याबाबत ज्योतिष शास्त्रात काय सांगितले आहे, ते जाणून घेऊ. 

कुंडली दोषावर उपाय म्हणून ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे तोडगे सांगितले जातात. पायात काळा धागा बांधणे हा देखील ज्योतिष शास्त्राचा एक तोडगा आहे. त्यामुळे कुंडलीतील राहू केतुचे प्राबल्य कमी होऊन जीवनातील अडचणींचे निराकरण होण्यास मदत होते असे ज्योतिष शास्त्र सांगते. मात्र तो फॅशन म्हणून बांधणे योग्य नाही. तो आकर्षण हेतू ठरेल पण संरक्षण हेतू काम करणार नाही. कारण, व्यक्तिसापेक्ष ग्रहदोषांवर निवारण केले जाते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे, त्यांनाच तो उपाय सांगितला जातो. 

राहू-केतू दोष निवारणासाठी

ज्यांच्या कुंडलीत राहू केतू दोष आहे, त्यांना ज्योतिषी एका पायात काळा धागा बांधा असा सल्ला देतात. हा धागा स्तोत्रमंत्रांचे उच्चारण करून प्रभावित केला जातो. मगच तो वापरण्याचा सल्ला दिला जातो 

शनीचा प्रभाव कमी होतो

शनिदेव हा उग्र ग्रह मानला जातो. ज्यांच्या आयुष्यात शनीची धैय्या आणि साडेसती सुरू असते त्यांनाही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. कारण शनी देवाला आपण काळया गोष्टी अर्पण करतो. काळा धागा देखील शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी बांधण्याचा सल्ला दिला जातो. 

पुरुषांनी कोणत्या पायात धागा बांधावा?

ज्योतिषांच्या मते, जर पुरुषांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यांनी मंगळवारी उजव्या पायाला काळा धागा बांधावा. असे केल्याने कुंडलीत शनि ग्रह बलवान राहतो. यासोबतच राहू-केतूही त्रास देत नाहीत.

महिला कोणत्या पायात काळा धागा बांधावा?

महिलांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य ठरते. त्यांनी शनिवारी हा धागा पायास बांधावा. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

धागा बांधणे ही अंधश्रद्धा मानावी का? 

जोवर कोणतीही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हिताच्या आड येत नाही, त्या मर्यादेपर्यंत ठेवलेली श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता येत नाही. श्रद्धा हा मानसिक दिलासा असून त्यावर सर्वस्वी विसंबून न राहता प्रयत्नांची जोड हवीच, हे ज्योतिष शास्त्रही सांगते. 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App