साप्ताहिक राशीभविष्य- दि. १४ ते २० मे २०२३: मनात आत्मविश्वास राहील, चांगल्या बातम्या कानावर पडतील; मुलांना योग्य संधी मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-05-14 10:43:24 | Updated: May 14, 2023 10:43 IST

Weekly Horoscope: मे महिन्याचा हा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Open in app

या सप्ताहात दि. १५ रोजी रवीं वृषभ राशीत प्रवेश करेल, अन्य कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल मेषेत असून, १५ रोजी रवी वृषभ राशीत जाईल. शुक्र मिथुनेत, मंगळ कर्क राशीत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्र भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. या सप्तीहात रविवार, सोमवार, मंगळवारी पूर्ण काळ पंचक असून, बुधवारी सकाळी ७:३९ पर्यंत पंचक राहील. सोमवारी अपरा एकादशी आहे. बुधवारी प्रदोष आहे. शुक्रवारी दर्श भावुका अमावास्या आहे. शनैश्वर जयंती आहे. शनिवारी आहे. रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी वैशाख कृष्ण दशमी ( दुसया दिवशी उत्तर रात्री २०४७ पर्यंत आहे. सकाळी १०:२६ पर्यंत शततारका, तर त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र राहील. रास दुसया दिवशी उत्तर रात्री ३:२४ पर्यंत कुंभ, तर त्यानंतर मीन राहील. आज पंचक आहे. दिवस सामान्य राहील. राहू काळ : सायंकाळी ४:३० ते ६.

मेष- आर्थिक व्यवहार जपूर करा. या सप्ताहाच्या सुरुवातीला आपली बरीच धावपळ होईल. कशात ना कशात व्यस्त राहाल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी वेळ द्याल. काही फायदे होतील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. आपले आर्थिक व्यवहार व नियोजन इतरांना सांगू नका. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. व्यवसायात बरकत राहील. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृषभ- आर्थिक लाभ होईल. या सप्ताहात चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र, कामाचा ताण वाढेल, एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला मिळेल. जवळच्या लोकांची ख्यालीखुशाली कळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घेतले जातील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

मिथुन- उम संमिश्र ग्रहमान संमिश्र ग्रहमानाचा अनुभव या आठवड्यात आपल्याला येईल. सुरुवात उत्साहात होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या उपक्रमात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग येतील. मात्र, प्रवासात दगदग होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. मात्र, त्यातील खाचाखोचा समजून घेऊन मगच कामास सुरुवात करा. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. टीप- सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कर्क- नवीन संधी मिळेल नवनवीन कल्पना विकसित कराल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, नवीन प्रयोग करून पाहिले जातील. त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. काही लोक तुमच्या समोर काही प्रस्ताव ठेवतील. मात्र, त्यातील व्यवहार्यता तपासून पाहिली पाहिजे. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा कराल. विविध प्रकारचे लाभ होतील. अडून राहिलेली कामे गती घेतील. नातेवाइकांच्या उपयोगी पडाल. त्यासाठी वेळ व पैसा खर्च होईल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

सिंह- नवीन ओळखी होतील. मनात आनंदी विचार राहतील. नवीन कार्यक्षेत्रात तुमचा वावर राहील, नवीन ओळखी होतील. त्या फायदेशीर ठरतील. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. मात्र, काही ना काही कारणाने कामे राहून जातील. जुनी प्रकरणे डोक्याला ताप निर्माण करतील. मात्र संयम सोडू नका. त्यातून आपण मार्ग काढाल, प्रवासाचे बेत ठरतील. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या- प्रेमात सावध राहा : भागीदारी व्यवहारात जपून कामे करा. कागदोपत्री व्यवहार करताना जाणकार मंडळीचा सल्ला घ्या. विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार नाही याची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. प्रेमात असणायांनी थोडे सावध असले पाहिजे. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. प्रवासात दगदग होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काही कारणाने धावपळ करावी लागू शकते. तुमच्या हातून समाजसेवा घडेल. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार, रविवार चांगले दिवस.

तूळ - प्रेमात सावध राहा आपल्या महत्त्वाच्या प्रकल्पात विलंब होईल. त्यामुळे थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. लोक तुमच्याकडे अपेक्षेने पाहतील. काही लोक तुमच्या मदतीला येतील तर काही लोक तुमच्या समोर अडचणी उभ्या करतील. व्यवसायात सतत कार्यरत राहावे लागेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तरुण वर्गाला प्रेमात सावध राहण्याची गरज आहे. काहीना तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

वृश्चिक- प्रसिद्धी मिळेल : मनात आत्मविश्वास राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांना योग्य संधी मिळतील. त्याच्या बुद्धिमत्तेला चांगला वाव मिळेल. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च केले जातील. आर्थिक अडचणी दूर होतील, व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. विरोधकाच्या कारवाया लक्षात येतील. थोडे तब्येतीला जपा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

धनू- नवीन संधी मिळेल : व्यवसायात सतत व्यस्त राहाल. कामधंद्याचा ताण राहील. काहींना प्रवास घडून येईल. भावंडांशी काही कारणाने गैरसमज होतील. त्यांच्याशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यात तुमचा फायदा होईल. मात्र, अटी आणि शर्ती समजून घ्या. घरात सतत लगबग, राहील. काहीतरी चिंता लागून राहील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चांगले दिवस.

मकर- यश मिळेल : तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. काही नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातील, भावंडांशी गैरसमज होतील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात अनोळखी लोकांपासून दूर राहा. आवडत्या भोजनाचा आनंद लुटता येईल. मात्र, मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

कुंभ- अडचणी दूर होतील : अनेक अडचणींवर मात करता येईल. अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. एखाद्या उलाढालीत अनपेक्षितपणे मोठा फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. मनासारखे भोजन मिळेल. मात्र, तिखट व तळलेले पदार्थ खाणे टाळा. अनपेक्षितपणे लोकांची मदत होईल. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. यश मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. घरी पाहुणी मंडळी येईल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

मीन- पुरस्कार जाहीर होतील जे लोक सतत काही ना काही करण्यात स्वतःला व्यस्त ठेवतात, अशा लोकांची कदर होईल. प्रसिद्धी, मानसन्मान, पुरस्कार जाहीर होतील. शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. प्रेमात सावध राहा. कुणी तुम्हाला मोहात पाडू शकते. नोकरदारांना शुभ परिणाम दिसून येतील. भावंडाशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरासाठी महागड्या वस्तू खरेदी कराल. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस, -विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :फलज्योतिष
Open in App