ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करत आहेत. यातील एक म्हणजे शुक्राचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले जात आहे. मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून आता शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ राशीचे स्वामित्व शुक्राकडे आहे. १८ जून रोजी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. (venus transit taurus 2022)
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह सुख, वैभव, भोग आणि विलासी जीवन यांचा कारक मानला गेला आहे. तसेच शुक्राचे स्वराशीत येणे उत्तम मानले गेले आहे. मात्र, काही राशीच्या व्यक्तींना शुक्राचा हा राशीबदल काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... (shukra gochar vrishabh rashi 2022)
‘या’ ४ राशीच्या अडचणीत भर पडेल!
मिथुन: या राशीच्या व्यक्तींना काही समस्या येऊ शकतात. आर्थिक बाजूने थोडे सावध राहावे लागेल, अनावश्यक खर्च वाढू शकतो. यासोबतच आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाद टाळा आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, तरच नात्यात स्थिरता येईल.
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. मात्र, अष्टम भावातील गोचरामुळे आपल्याला आगामी कालावधी संमिश्र ठरू शकेल. इच्छित परिणाम प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्य बिघडू शकते. गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. या काळात पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. विचारपूर्वक गुंतवणूक करा.
धनु: या राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधीत सावधगिरी बाळगावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी होणार्या राजकारणापासून दूर राहिले तर बरे होईल. गुपिते कोणाशीही सांगू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ध्यानधारणा, योगसाधना करणे उपयुक्त ठरू शकेल. भावंडांच्या तब्येतीची काळजी वाटेल.
मीन: या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी कालावधी संमिश्र ठरू शकतो. या काळात मनोरंजनाच्या साधनांवर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतील. ज्यामुळे पुढे तुमचे बजेट ढासळू शकते. रोजगाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. मेहनतीत सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहावे. तुमच्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता आहे.