Magal Dosha: लग्न जुळवताना मंगळ दोष पाहून स्थळ नाकारताय? थांबा आधी ही माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-06-04 12:14:06 | Updated: June 4, 2022 12:14 IST

Match Making: सद्यस्थितीत लग्न जुळणे ही कठीण बाब झाली आहे. अशातच मंगळाची पत्रिका पाहूनच लोक नाक मुरडतात. पण तसे करणे योग्य आहे की अयोग्य ते आधी जाणून घेऊया. 

Open in app

मुलीला कडक मंगळ आहे, लग्न जुळणार नाही. मुलाच्या पत्रिकेत मंगळ दोष दाखवत आहेत पत्रिका जुळणार नाही. मंगळ असलेल्या लोकांचे लग्न लवकर होत नाही. मंगळ म्हणजे सगळ्याच गोष्टी उशिरा... या आणि अशा कितीतरी गैरसमजुतींमुळे बिचारी विवाहेच्छुक मंडळी लग्नाची बाकी आहेत. एकीकडे मनुष्य मंगळावर वस्ती करण्याच्या दिशेने विचार करत असताना दुसरीकडे मंगळ दोषामुळे लग्न अडली आहेत, हे विचार खूपच परस्परविरोधी आहेत ना? या विचारात नेमकी मेख कुठे आहे ते पाहू. 

मुळात पत्रिकेतील मंगळ 'दोष' नसून तो 'योग' आहे. दोष या शब्दामुळे एकूणच नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे आपल्या कुंडलीत अन्य ग्रहांची स्थिती असते त्याप्रमाणे मंगळ या ग्रहाची स्थिती असते. तो देखील प्रत्येकाच्या कुंडलीत असतो. तो अमुक एक स्थानावर आल्यास त्याला मंगळ योग असे म्हणतात. परंतु त्यामुळे तो दोष अजिबात ठरत नाही. 

पूर्वीच्या काळी लग्न जुळवताना मुलामुलींचे फोटो पाहण्याची किंवा प्रत्यक्ष पाहण्याची प्रथा नव्हती. तर केवळ पत्रिका पाहून गुण मिलन केले जात असे.  त्यांच्याबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल माहिती मिळाली की मुला मुलीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वागणं, बोलणं, उंची, रूप, रंग, कर्तृत्व यांचे अनुमान कुंडलीतील ग्रहांवरून ठरवले जात असत. ज्यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास अचूक असे, असे ज्योतिषी कुंडलीवरून अचूक भाष्य करत असत. अशात कुंडलीतील मंगळ योग व्यक्तीचा स्वभाव दर्शवतो.

उच्चीचा मंगळ असणारी व्यक्ती अथक मेहनत घेणारी, जिद्दी, स्वाभिमानी आणि शीघ्र कोपी म्हणजेच पटकन रागावणारी, संतप्त डोक्याची मानली जाते. अशा व्यक्तीचा विवाह जर सौम्य मंगळ योग असणाऱ्या व्यक्तीशी जुळवून दिला तर संसार तग धरून राहील. अन्यथा दोघेही मंगळ योगाचे असतील तर कोणीच माघार घेणार नाही आणि घराची युद्धभूमी होईल व संसारात काडीमोड घ्यावा लागेल. ही दूरदृष्टी मंगळ योगावरून ठरवली जात असे. मात्र अशी कुंडली जुळवताना समोरच्या पक्षाची ग्रहस्थिती लवकर जुळून न आल्याने मंगळ योगाला मंगळ दोष संबोधले जाऊ लागले. 

परंतु आजच्या काळात प्रेम विवाहाला मुलांची सर्वाधिक पसंती असल्यामुळे ज्योतिषी सांगतात, 'प्रेमविवाह करणार असाल तर पत्रिका बघू नका, कारण तुम्ही परस्परांना गुण दोषांसकट स्वीकारले आहे. हे मनोमिलन गुणमीलनाइतकेच महत्त्वाचे आहे.' अशा विवाहात प्रेम, सामंजस्य, आत्मीयता असेल तर कोणतीही ग्रहस्थिती आपोआप संसाराला अनुकूल होत जाते. तसेच पत्रिका पाहून लग्न करावयाचे झाल्यास मंगळ योगाला अनुकूल पत्रिका पाहून लग्न केले आणि त्याही पलीकडे एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारण्याची तयारी दाखवली, तर मंगळ ग्रह देखील मंगल ठरायला वेळ लागणार नाही....!

टॅग्स :फलज्योतिष
Open in App