Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मंगळाची असते विशेष कृपा; भाग्याची साथ अन् संपत्ती अपार

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-06-21 15:15:24 | Updated: June 21, 2022 15:15 IST

Numerology: तुमचा मूलांक कोणता? कोणत्या मूलाकांच्या व्यक्तीना मंगळाचे मंगलमय शुभाशिर्वाद लाभू शकतात, जाणून घ्या...

Open in app

आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ९ आहे. मंगळ हा मूलांक ९ चा स्वामी आहे. आताच्या घडीला मंगळ आपलेच स्वामित्व असलेल्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मंगळाचा प्रभाव राशींसह मूलाकांवरही पडेल, असे सांगितले जाते. मंगळ ग्रह ऊर्जा, जमीन, गती, भावंडे, शौर्य, शक्ती, पराक्रम यांचा कारक मानला जातो. 

प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात

मूलांक ९ असलेले लोक शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम असतात. अंकशास्त्रानुसार हे लोक ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. त्यांचे जीवन काहीसे संघर्षमय असते. पण या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची ताकद असते. लोक कलात्मक स्वभावाचे असतात. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतात. त्यांना कला आणि विज्ञानात जास्त रस असतो.

रिअल इस्टेटच्या बाबतीत हे लोक भाग्यवान

मूलांक ९ असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते खूप पैसे खर्च करतात. पण रिअल इस्टेटच्या बाबतीत हे लोक भाग्यवान ठरतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना पैसे मिळतात. त्यांच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र, ते खंबीरपणे सामोरे जातात. हे लोक धोका पत्करून पैसे कमवतात. एकूणच त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. प्रेमसंबंधात अडचणी येतात. कधीकधी रागामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो. वैवाहिक जीवन संकटांनी भरलेले आहे.

या क्षेत्रात करिअर केल्यास होतात यशस्वी

मूलांक ९ असलेल्या लोकांना सामान्यतः अभियंता, डॉक्टर, राजकारण, पर्यटन किंवा वीज संबंधित कामात यश मिळते. मूलांक ९ असणाऱ्यांनी हनुमंताची पूजा करावी. यामुळे सर्व समस्या लवकर दूर होतील. घरामध्ये त्रास असेल तर मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडचा पाठ करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास आर्थिक समृद्धी, मान-सन्मान आणि कीर्ती प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 
 

टॅग्स :संख्याशास्त्रफलज्योतिष
Open in App