June Birthday: 'मी म्हणेन ती पूर्व' हा स्वभाव बदलला तर 'जून' मध्ये जन्मलेल्या लोकांची 'अजून' प्रगती होईल!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-05-31 12:43:14 | Updated: May 31, 2022 12:43 IST

June Birthday : ग्रह, नक्षत्र, तारे यांचा आपल्या जडण घडणीत हातभार असतोच, शिवाय आपला जन्म महिना देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाचे भाकीत करतो. जाणून घेऊया जून महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभावाविषयी!

Open in app

जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ज्योतिषशास्त्रानुसार हट्टी आणि रुक्ष स्वभावाच्या असतात. ते आपल्या तुसड्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात. हट्टी स्वभावामुळे ते अनेक नाती तोडून बसतात परंतु याबद्दल त्यांना जराही पश्चात्ताप नसतो. त्यांना आपले तेच खरे करण्याची वाईट सवय असते. दुसऱ्यांना झुकवण्यात त्यांना आनंद वाटतो.

कोणाच्या हाताखाली काम करणे त्यांना विशेष जमत नाही. जमले तरी फार काळ एका जागी टिकत नाहीत. सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी त्यांचे वाद विवाद होत राहतात. रागाच्या बाबतीत त्यांचा पारा चढला, की बराच काळ तो खाली उतरण्याचे नावच घेत नाही. स्वत:च्या रागावर त्यांचे नियंत्रण नसते. रागाच्या भरात ते वाट्टेल ते बोलतात. आपले काम साधून घेण्यासाठी कोणाशीही गोड बोलण्याची त्यांची तयारी असते. यातून त्यांची स्वार्थी वृत्ती डोकावते.

प्रेमाचा स्वीकार ते खुलेपणाने करत नाहीत, पण ज्याच्यावर करतात, त्याच्याविरुद्ध कोणीही बोलले तर तिसरे महायुद्ध छेडायलाही ते कमी करत नाहीत. म्हणजेच जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा करतात. ही अपेक्षा जोडीदारासाठी कधी कधी डोकेदुखी होऊन बसते. या व्यक्ती आनंदी असल्या की सगळे जग समोरच्यावर लुटवून टाकतील, पण रागात असतील तर समोरच्याला जगणे नकोसे करतील.

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना उच्च राहणीमान आवडते. उच्च जीवनशैली, उच्च विचार, उच्च स्वप्न अशा उच्च पातळीवर सतत वावरल्याने बाकीच्यांना ते गौण समजतात आणि आपल्याच जगात हरवलेले असतात. काही बाबतीत एवढे कठोर बनतात, की यांना हृदय आहे की नाही, अशी शंका येते. 

समोरच्याला समजून न घेता त्याचे परीक्षण करणे, ही सर्वात मोठी चूक त्यांच्याकडून घडते. त्यामुळे ते आपणच आपली मते तयार करतात आणि त्या मतांनुसार समोरच्याला वागणुक देतात. दुसऱ्याला काय वाटेल याची त्यांना फिकीर नसते आणि कोणी आपल्यावर रागावले, याचे दु:खंही नसते.

अशा लोकांनी थोडे दुसऱ्यांना समजून घेतले पाहिजे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. नकारात्मक विचार बंद केले पाहिजेत. समजून उमजून निर्णय घेतले पाहिजेत. तर आणि तरच त्यांचा टिकाव लागेल आणि त्यांना कोणत्याही सुखांपासून वंचित राहावे लागणार नाही. 

या महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती- अनिल अंबानी, डिंपल कपाडिया, शिल्पा शेट्टी, करिष्मा कपूर, एकता कपूर, सोनाक्षी सिन्हा, सुंदर पिच्चई

टॅग्स :फलज्योतिष
Open in App