हिंदू धर्मात गंगा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. गंगा मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की गंगेत स्नान केल्याने सर्व पाप धुतली जातात. गंगेची पवित्रता माणसाची सर्व पापे धुवून टाकते. त्यामुळे उपवासाच्या सणांसह सर्व विशेष प्रसंगी गंगा नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. ज्येष्ठ शुद्ध दशमी या तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. गंगा दशहरा हा गंगा नदीच्या पृथ्वीवर अवतरण्याचा दिवस आहे. यंदा तो ९ जून रोजी येत आहे. तसेच या दिवशी महायोग जुळून येत आहेत.
हे महायोग पुढील प्रमाणे :
२०२२ मधील गंगा दशहरा अनेक अर्थांनी खास आहे. या तिथीच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती अतिशय शुभ आहे. यामुळे ४ शुभ योग तयार होत आहेत. ग्रहांचा असा संयोग दुर्मिळ आहे. या कारणास्तव, यादिवशी गंगा स्नान व दान करावे.
या दिवशी सूर्य आणि बुध हे ग्रह वृषभ राशीत राहून बुधादित्य योग तयार करतील. याशिवाय या दिवशी रवि योगही तयार होत आहे. तसेच हस्त नक्षत्र सुरु होत आहे. गंगा नदीचे अवतरण हस्त नक्षत्रातच झाले. हे नक्षत्र लक्ष्मी मातेचे आवडते नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रात केलेले सत्कार्य खूप शुभ फल देते. याशिवाय व्यतिपात योग आणि यश योग देखील तयार होत आहेत.
गंगा दशहरा स्नानाचा मुहूर्त
गंगा दशहराच्या दिवशी गंगेत स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते. तसे शक्य नसेल तर पहाटे लवकर उठून घरी स्नान करावे आणि ते करत असताना गंगेचे स्मरण करावे. तसे केल्यानेही गंगा स्नानाचे पुण्य लाभते. हे केवळ एक दिवसच नाही, तर ही सवयच लावून घेतली तर कायम घरच्या घरी गंगा स्नानाचे पुण्य लाभेल.
गंगा दशहराला पुढील वस्तूंचे दान करा
या दिवशी गंगा स्नानाइतकेच दानालाही महत्त्व आहे. दानधर्माशिवाय कोणतीही उपासना वा परमार्थ अपूर्ण मानला जातो. या दिवशी गरजू व्यक्तीला, विद्यार्थ्याला उपयोगी पडतील अशा वस्तूंचे दान करणे पुण्याचे ठरते. यात छत्री, रेनकोट, चपला, वह्या, पुस्तक, दप्तर, डबा, पाण्याची बाटली अशा कोणत्याही वस्तूंचे दान करता येईल. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही एक वर्षांसाठी दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक भार उचलू शकता. थोडक्यात भगीरथाने ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचा विचार करून त्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले व त्याच्यावर भगवंत कृपा झाली त्याप्रमाणे आपणही कोणासाठी सुखाचे कारण बनावे, जेणेकरून आपल्यालाही भगवंत कृपा लाभेल!