रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:27 IST2026-01-14T12:26:47+5:302026-01-14T12:27:49+5:30
Amravati : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Whose math will the independents in the fray spoil? 120 independent candidates in the fray in Amravati
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काही उमेदवार असे आहेत ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले नव्हते, तरीही ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. मात्र अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. अपक्षांची उमेदवारी ही यंदा निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत १९९२ आणि १९९७ मध्ये अपक्ष उमेदवारांचा बोलबाला होता, हे विशेष.
अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ एक दिवस उरलेला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान तर उमेदवारांच्या बाजूने प्रचार सुरू आहे. तसेच प्रशासनाच्या बाजूनेही तयारी पूर्ण झाली आहे. १९९२ च्या निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या, तर २८ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. १९९७ च्या निवडणुकीत २५ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, तर २०१७च्या निवडणुकीत केवळ एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता.
मागील सहा निवडणुकीतील उमेदवारांचा लेखाजोखा
महापालिका निवडणुकीत १९९२ मध्ये सर्वाधिक २८ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. १९९७ मध्ये २५ आणि २००२ मध्ये ५, २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये ८ आणि २०१७ च्या निवडणुकीत एका उमेदवाराने विजय मिळवला होता. १९९२ आणि १९९७ च्या निवडणुकीत वॉर्ड प्रक्रिया होती, ज्यामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक संधी होती. त्यानंतर प्रभाग रचना पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
अपक्ष उमेदवारांचे 'मैं नही तो तू भी नहीं'
अमरावती महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान २२ प्रभागांत १२० अपक्ष उमेदवारांनी धूम केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अपक्षांची उमेदवारी प्रचंड त्रासदायक ठरली. यात काही अपक्ष हे राजकीय पक्षांचे बंडखोर म्हणून रिंगणात आहेत. तिकिटासाठी प्रमुख दावेदार असताना काहींचा स्थानिक नेत्यांनी तिकीट न मिळू देण्यासाठी 'गेम' केला. परिणामी बहुतांश नाराज अपक्षांनी उमेदवारी दाखल करून ते निवडणूक रिंगणात आहेत. आता तर 'मैं नहीं तो, तू भी नहीं' अशीच रोखठोक भूमिका अनेक अपक्ष उमेदवारांनी घेतल्याचे चित्र आहे.