Violence of the spoilage conspiracy viral of Yashomati | यशोमतींना पराभूत करण्याच्या षड्यंत्राची ध्वनिफित व्हायरल

यशोमतींना पराभूत करण्याच्या षड्यंत्राची ध्वनिफित व्हायरल

ठळक मुद्देराजकीय भूकंप : सूर्यवंशींची कबुली, रावसाहेबांचा इन्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यशोमती ठाकूर यांना निवडणुकीत पराजित करण्यासाठी आखल्या जाणाऱ्या षड्यंत्राच्या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नेता तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे त्यात आवाज असल्याचे संदेशही ध्वनिफितीसोबत फिरत आहेत. पाच कोटी रुपयांच्या बजेटचा उल्लेख त्या ध्वनिफितीत असल्यामुळे स्थानिक राजकीय क्षेत्रात जणू भूकंपच आला आहे.
लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेली ध्वनिफित विशेष अर्थपूर्ण ठरते. वनात वणवा पसरावा त्या वेगाने ही ध्वनिफित जिल्हाभरात पसरली. प्रत्येकच मोबाइलमध्ये पोहोचलेल्या या ध्वनिफितीचा सामान्यजन एकीकडे आनंद लुटत असतानाच राजकारण्यांच्या वृत्तीवर कठोर प्रहारही करीत आहेत.
ज्यांच्याविरुद्धचे संभाषण त्या ध्वनिफितीत आहे, त्या यशोमती ठाकूर यांनी यासंबंधी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सर्वाधिक वेळ ज्यांचा आवाज आहे, त्या दिनेश सूर्यवंशी यांनी मात्र सदर आवाज त्यांचाच असल्याची कबुली बुधवारी पत्रकारांना दिली. रावसाहेब शेखावत यांनी सदर ध्वनिफितीतील त्यांचा आवाज बनावट असल्याचे आणि भाजपने त्यांच्याविरुद्ध रचलेले हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एकूण ३ मिनिटे ३८ सेकंदाच्या त्या ध्वनिफितीत यशोमती ठाकूर यांना तिवसा मतदारसंघातून पाडण्यासाठीची चर्चा केली गेली. दिनेश सुर्यवंशी आणि रावसाहेब शेखावतांच्या आवाजातील या चर्चेत दोनदा आमदार राहिलेल्या यशोमती ठाकूर या महिला नेत्याचा एकेरी शब्दांत उल्लेख केला जात असल्याचे ध्वनिफितीत ऐकता येते. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि तेथील मतदारांच्या धर्माबाबतची चर्चा त्यात आहे. यशोमती यांना पाडणे कसे सोपे आहे, याचे समीकरण दिनेश सूर्यवंशी मांडत आहेत. त्यांनी आणखी काय करावे, यासंबंधी एक इसम त्यांना सल्ला देत आहे. त्या इसमाचा आवाज रावसाहेब शेखावतांच्या आवाजाशी तंतोतंत जुळतो आहे.

पाच कोटी रुपयांचा उल्लेख
या संभाषणात पाच कोटी रुपयांच्या बजेटचा उल्लेख करण्यात आला आहे. जनता दरबार आदी कार्यांसाठी तुम्हाला पाच कोटी रुपये लागतील, असे सांगून 'यू विल गेट दी मनी' असे आश्वासनही दिनेश सूर्यवंशी यांना देण्यात येत असल्याचे संभाषणात ऐकता येते.

निवेदिता चौधरी, सुनील देशमुख, प्रवीण पोटे
निवेदिता चौधरी यांचा गैरसमज होऊ नये तसेच सुनिल देशमुख आणि प्रवीण पोटे यांची अनुकूलता आहे की कसे, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या चर्चेत झाल्याचे संभाषणात ऐकता येते. उल्लेखित तिन्ही नेत्यांचा आवाज वा संवाद या संभाषणात मात्र नाही.

प्रवीण पोटे अनुकूल असल्याचा उल्लेख
दिनेश सूर्यवंशी यांनी तिवस्यातून लढावे, यासाठी प्रवीण पोटे हे पूर्णत: अनुकूल असतील, असा आशय सूर्यवंशी यांच्या चर्चेतून व्यक्त होतो. निवडून येण्यासाठी काँग्रेसजनांची आपण मदत घेता. त्यामुळे यशोमती यांच्याबाबतची आपली भूमिका आत्ताच स्पष्ट करा, असे मी प्रवीण पोटे यांना विचारले. त्यांनी अनुकूलता दर्शविली, असे संभाषण सूर्यवंशी यांच्याकडून केले जात आहे.

Web Title: Violence of the spoilage conspiracy viral of Yashomati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.