झाडाखाली आश्रय घेणे बेतले जीवावर; वीज कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 15:29 IST2022-07-09T15:28:16+5:302022-07-09T15:29:41+5:30

दुपारी पाऊस सुरू झाल्याने सर्व जण झाडाच्या आश्रयाला थांबले होते. याच वेळी वीज झाडाकडे झेपावली.

Two killed, one seriously injured in lightning strike | झाडाखाली आश्रय घेणे बेतले जीवावर; वीज कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर

झाडाखाली आश्रय घेणे बेतले जीवावर; वीज कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर

माहुली जहागीर : नजीकच्या धानोरा कोकाटे गावालगत जामडोल शिवारात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

किशोर भगवान पाटील (४२) व अविनाश श्यामराव निंभोरकर (३५, दोघेही रा. करजगाव, ता.जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. अण्णू लक्ष्मण भोयरे (४०, रा. करजगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. कृष्णा आप्पा रामापुरे यांचे २८ एकर शेत ते अनेक वर्षांपासून लागवणीने करीत होते. या शेतात यंदा सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी किशोर पाटील हे स्वमालकीचा ट्रॅक्टरचलित टँकरने पाणी घेऊन शेतात आले होते. या तिघांसह आणखी तीन जण शेतात कामाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, दुपारी साडेतीनला पाऊस सुरू झाल्याने सर्व जण झाडाच्या आश्रयाला थांबले होते. याच वेळी वीज झाडाकडे झेपावली. त्यामुळे किशोर, अविनाश व अण्णू हे गंभीररीत्या भाजले गेले. यात अविनाशचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होताच मरण पावला. अण्णूवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेची दखल माहुली जहागीर पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Two killed, one seriously injured in lightning strike