आज थांबणार प्रचाराची रणधुमाळी ; उद्या 'कत्ल की रात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:03 IST2026-01-13T17:02:26+5:302026-01-13T17:03:41+5:30
Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचार रॅली, घरोघरी संवादावर भर

The campaign frenzy will end today; tomorrow will be the 'night of murder'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५:३० वाजता थांबणार आहे, तर बुधवारी (दि. १४) उमेदवारांसाठी 'कत्ल की रात' ठरणार असून, त्याअनुषंगाने सर्वानीच तशी रणनीती आखली आहे. मात्र मंगळवारी रॅली, घरोघरी संवाद आणि जोरदार शक्तिप्रदर्शनाद्वारे मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे.
सोमवारी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), उद्धवसेना, शिंदेसेना, बसप, एमआयएम, वंचित आदी पक्षांनी रॅली, सभा आणि थेट मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. एका पक्षाचा नेता दारातून पडतो न पडतो, तोच दुसऱ्या पक्षाची माणसे हजर होत होती, असा प्रचार सुरू होता. ध्वनिक्षेपकावरून होणाऱ्या 'लक्षात असू द्या' ते 'ताई, बाई अक्का' आदी घोषणांनी अमरावती महानगर दणाणून गेले होते. तर गुरुवारी (दि. १५) मतदान होणार असून, २२ प्रभागातून ८७ सदस्य निवडले जाणार असून रिंगणात ६६१ उमेदवार आहेत.
पथदिवे, इमारती, दुकानांवर स्टिकर
मतदानाच्या दिवसांपर्यंत आपले नाव, पक्ष आणि चिन्ह मतदारांच्या लक्षात राहावे यासाठी अनेकांनी स्टिकर छापले आहेत. पथदिवे, विजेचे खांब, सार्वजनिक शौचालये, इमारती, दुकानांच्या भिंती, घराच्या दर्शनी भागात मिळेल तिथे उमेदवारांनी चिकटवले आहे. त्याच बरोबर जाहीरनामा, वचननामा, पत्रके, कामाचा अहवाल पोहोचवला आहे.
गोंधळ, धावपळ आणि शक्तिप्रदर्शन
प्रचाराचा मंगळवार शेवटचा दिवस असल्यामुळे स्थानिक नेते, आमदारांच्या सभा, रॅली, कॉर्नर बैठकींचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजतापर्यंत प्रचार आटोपावा, असे मायक्रो प्लॅनिंग सर्वच राजकीय पक्षांनी चालविले आहे. काही ठिकाणी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. मंगळवार हा उमेदवारांचा गोंधळ, धावपळ आणि शक्तिप्रदर्शनाचा असणार आहे. त्यामुळे या साऱ्यांचे मतपरिवर्तन होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रचारबंदीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
निवडणूक प्रचार कालावधी मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्षास प्रचार करण्यास मनाई आहे, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा- चांडक यांनी दिले आहे.