अमरावती महापालिकेच्या निवडणूक कर्तव्यास दांडी मारणाऱ्या ५१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शोकॉज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:01 IST2026-01-01T18:57:24+5:302026-01-01T19:01:52+5:30
Amravati : प्रशिक्षण व कर्तव्यात गैरहजर असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

Notice to 514 officers and employees of Amravati Municipal Corporation who neglected their election duties
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ५१४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बुधवारी बजावण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत. प्रशिक्षणाच्या व्यवस्थेसाठी अमरावती महापालिकेचे एकूण पथक ९०० आणि एकूण ३६०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रशिक्षण सत्रांना अनुपस्थिती वा प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्यात गैरहजर राहणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, उत्तर समाधानकारक न मिळाल्यास शिस्तभंग, विभागीय चौकशी तसेच नियमानुसार दंडात्मक कारवाई होईल. प्रशासनाकडून पुढील काळात उपस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
"निवडणूक कर्तव्य हे कायदेशीर व अनिवार्य असून त्यात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. ज्यांनी कर्तव्याप्रती दांडी मारली त्यांच्यावर अन्यथा कठोर प्रस्तावित केली जाणार आहे."
- सौम्या शर्मा चांडक, आयुक्त महापालिका