मोर्शी नगराध्यक्षपदासाठी आजपासून रणधुमाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 12:56 IST2019-12-04T12:52:39+5:302019-12-04T12:56:24+5:30
नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होईल. त्यासाठी मोर्शी नगरपालिकेच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मोर्शी नगराध्यक्षपदासाठी आजपासून रणधुमाळी
मोर्शी : नगराध्यक्षपदासाठी २९ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होईल. त्यासाठी मोर्शी नगरपालिकेच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नगराध्यक्ष शीला अशोक रोडे यांचे १० जून रोजी आजाराने निधन झाले. तेव्हापासून नगराध्यक्षपद रिक्त होते. त्या भाजपच्या उमेदवारीवर
जिंकल्या होत्या.
आता पुन्हा एकदा ते पद मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच होत आहे. मात्र, राज्यात तीन पक्षांची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत एकच उमेदवार दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निवडून जाणाऱ्या नगराध्यक्षपदाचा कालावधी हा दोन वर्षांचा असल्याने व नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपतर्फे अनेक महिला दावेदारी करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविलेल्या व मागील निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झालेल्या मेघना मडघे यासुद्धा रिंगणात असतील. भाजप तर्फे माजी नगराध्यक्ष रेशमा उमाळे, छाया ढोले, रुपाली राऊत, माजी नगराध्यक्ष दिवंगत शीला रोडे यांच्या कन्या अश्विनी वानखडे, दीपाली भडांगे व सुनीता अढाऊ यांनीसुद्धा निवडणूक लढविण्याचा मनोदय केला आहे. ही निवडणूक अवघ्या पंचवीस दिवसावर येऊन ठेपली आहे.
शहरात नवे समीकरण
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीव्या निमिताने नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. मोर्शी विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा याच आघाडीत सहभागी असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मोशी नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेतर्फे प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने, नगरसेविका क्रांती संजय धावडे (चौधरी) यांची नावे चर्चेत आहेत.