Lok Sabha Election 2019; मेळघाटात मतदानाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:51 IST2019-04-03T11:47:54+5:302019-04-03T11:51:02+5:30
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.

Lok Sabha Election 2019; मेळघाटात मतदानाची रंगीत तालीम
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: सोमवारी वैराट येथे जाऊन संपूर्ण माहिती घेतली. मतदानाच्या दिवशीची टक्केवारी मिळवण्यासाठी १३३ गावांमध्ये तात्पुरत्या उभारल्या जाणाऱ्या यंत्रणेचे त्यांच्यासमक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.
चिखलदरा व धारणी तालुक्यातील संपर्कविहीन १३३ गावासाठींची संपर्क यंत्रणा कशी, हे जाणून घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित झोनल अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी ८ वाजताच संबंधित गावात पाठविण्यात आले. हे सर्व अधिकारी दिवसभर मेळघाटच्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये गेले. निवडणुकीदरम्यान करण्यात येणाऱ्या सर्वच प्रकारची माहिती त्यांनी गोळा केली. तेथून नजीकच्या वायरलेस केंद्रावरून चिखलदरालगतच्या वैराट येथील कंट्रोल रूमवर ती माहिती पाठविली. रायपूर, सेमाडोह, आत्रू चौराकुंड, हरिसाल, ढाकणा, डोलार, तारूबांदा, चिखली, आवागड या जवळपासच्या २० सबस्टेशनवरून वैराट कंट्रोल रूमकडे माहिती पाठविण्यात आली.
आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली स्थिती
जवळपास १३३ गावांतील माहिती मिळणे कठीण असते. मतदान आटोपल्यावर ईव्हीएम येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सकाळी १० वाजता स्वत: वैराट येथे जाऊन प्रात्यक्षिक घेतले. त्यापूर्वी ८ वाजता परतवाडा येथील फातिमा कॉन्व्हेंटमधून निवडणूक पथके मेळघाटात पाठविली. ती पथके पोहोचली किंवा त्यांना काय अडचणी आल्यात, प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कुठल्या अडचणी उद्भवू शकतात, याचा धांडोळा घेतला.
मेळघाट नॉट रिचेबल, निवडणूक यंत्रणेची धावपळ, पहिल्यांदा वनविभागाची मदत
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलात वसलेल्या १३३ गावांमध्ये पहिल्यांदा निवडणुकीसाठी जवळपास २२ वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. वनविभागाची वाहने व अधिकारी निवडणूक कामात प्रत्यक्ष भाग घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात आदिवासींच्या सुख-दु:खाची प्रशासनाला माहिती पोहोचविण्यासाठी याच वायरलेस यंत्रणेचा उपयोग केला जातो.
ज्या ठिकाणी मोबाइलने संपर्क होऊ शकत नाही, मेळघाटातील अशा गावांमध्ये वनविभागाच्या वायरलेस यंत्रणेमार्फत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील माहिती घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी वैराट येथे प्रत्यक्ष पाहणी केली.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी, अमरावती