Lok Sabha Election 2019; मेळघाटच्या दुर्गम भागात ८० जीपने पोहोचणार मतदान कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:35 IST2019-04-03T11:34:50+5:302019-04-03T11:35:28+5:30
मेळघाटात सर्वाधिक ४० झोन राहणार आहेत. अतिदुर्गम भागात एसटी बस पोहोचत नसल्याने मतदान कर्मचाऱ्यांसाठी जीप व छोट्या वाहनांचा वापर केला जाणार आहे.

Lok Sabha Election 2019; मेळघाटच्या दुर्गम भागात ८० जीपने पोहोचणार मतदान कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरी सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, प्रशासनाला विविध पर्यायांचा विचार करावा लागत आहे. मेळघाटात सर्वाधिक ४० झोन राहणार आहेत. अतिदुर्गम भागात एसटी बस पोहोचत नसल्याने मतदान कर्मचाऱ्यांसाठी जीप व छोट्या वाहनांचा वापर केला जाणार आहे. सुमारे ८० जीपच्या साहाय्याने मतदान कर्मचारी अधिकारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.
मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत धारणी, चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. मेळघाटात ३५५ मतदान केंदे्र आहेत. मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित केंद्रावर पोहचवून देण्यासाठी वाहतूक आराखडासुद्धा तयार करण्यात आला आहे. मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी आजही रस्त्याची वानवा आहे. परिणामी ९७ मतदान पथकांसाठी ४९ क्रूझर गाड्यांंची व्यवस्था करण्यात आली आहे. १९ क्रूझर आणि २१ टाटा सुमो आणि बोलेरो जीपमध्ये ४० झोनल अधिकारी व कर्मचारी असतील. मेळघाटचा दुर्गम भाग पाहता सर्वाधिक झोन ठेवण्यात आले आहेत. एका झोनवर ९ ते १२ मतदान केंद्रे राहणार आहेत. २० प्रवासी क्षमतेच्या पाच मिनीबस, १७ प्रवासी क्षमतेच्या दोन मिनीबससह २८ एसटी बस अशा वाहनातून मतदान पथके ३५५ मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचा सूक्ष्म अभ्यास
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुर्गम भागात वेळेवर कुठलीही अडचण उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मेळघाट पालथा घातला आहे. जिल्ह्यात नवीन असल्याने ते स्वत: मेळघाट जाणून घेत आहेत. त्यानुसार त्यांनी मेळघाटातील मतदानकेंद्रांचा आराखडा तयार केला. जुन्या आराखड्यात व्यापक बदल केले. मतदान केंद्रापासून चिखलदरा व धारणी तालुका मुख्यालयाचे अंतर पाहता, पूर्वी पहाटे पाच वाजेपर्यंत मतदान पथके पोहोचत होती. आता मतदानाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.