‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:16 AM2019-04-12T01:16:42+5:302019-04-12T01:17:21+5:30

लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे.

'King' screams in the famine | ‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

Next
ठळक मुद्देनेते प्रचारात मश्गूल : आठ तालुक्यांतील वेदना जाहीरनाम्यात बेदखल

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याच्या वेदनेला स्थान मिळालेले नाही. निवडणुकीच्या गदारोळात खेडेगावांतील मतदारराजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे भान या नेत्यांना नसल्याची शोकांतिका आहे.
प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. या स्थितीत दुष्काळदाहात होरपळणाऱ्या मतदारराजाची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. शेतातील विहिरींचे दिवसागणिक खोल जाणारे पाणी त्याच्या डोळ्यांच्या धारांनीही भरून आलेलं नाही. जिवापाड जगविलेल्या संत्राबागेचं पान न पान गळायला लागलं, तसतसा बळीराजा आतून तुटला आहे. तसे पाहता जिल्ह्याच्या गावगावांत हीच स्थिती आहे. यंदाच्या खरिपात कमी पावसाने नगदी पिके गारद झाली. धारणी वगळता उर्वरित १३ तालुक्यांची पैसेवारी ही ५० च्या आत आहे. शासनाने मात्र कागदोपत्री छळ चालवित केवळ चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून ‘एनडीआरएफ’च्या सवलती दिल्यात. उर्वरित दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरूड व अमरावती तालुक्यात पैसेवारीच्या आधारावर दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र, कुठल्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. आता तर निवडणुकांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही याचा विसर पडलेला आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्के कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याचे नगदी पीक सोयाबीनसह ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीददेखील उद्ध्वस्त झालेत. उत्पादनखर्चाच्या तुलनेत ५० टक्केही शेतमाल उत्पादन झालेले नाही. पावसाच्या दीर्घ दडीने कपाशी पिकाची वाढ खुंटली व गुलाबी बोंडअळीच्या तडाख्यात कापसाची वाट लागली.
जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाने १३ तालुक्यांची पैसेवारी कमी लावून पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला,तर उर्वरीत आठ तालुक्यांची सवलतीवरच बोळवण केली. ज्या तालुक्यांना मदत जाहीर केली, ती चार टप्प्यात देण्यात आली. त्यातही अर्ध्याअधिक शेतकºयांना आजही मदतनिधी मिळाला नाही, हे जिल्ह्याचे वास्तव आहे.
७३१ दुष्काळी गावांची सवलतींवरच बोळवण
जिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या आठ तालुक्यांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. या तालुक्यातील ७३१ गावे दुष्काळाची भीषण स्थिती अनुभवत आहेत. यात अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूर बाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना शासनाने दुष्काळी मदतनिधी न देता केवळ आठ प्रकारच्या सवलतींवरच बोळवण केलेली आहे.
१५ मंडळात दुष्काळ; मदतनिधी नाही
यंदा ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या निकषावर जिल्ह्यातील १५ गावांना दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळ जाहीर केला; मात्र मदतनिधी दिलेला नाही. केवळ जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषिकर्जाच्या वसुलीस स्थगिती, शाळा- महाविद्यालयांची शुल्कमाफी, रोहयोच्या कामाच्या निकषात सुधारणा आदी सवलती जाहीर केल्यात. मात्र, यातील अनेक सवलतींचा लाभ शेतकरी व त्यांच्या पाल्यांना मिळालेला नाही, हे जिल्ह्याचे दुदैव आहे.

Web Title: 'King' screams in the famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.