प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:25 IST2026-01-06T18:24:34+5:302026-01-06T18:25:10+5:30
Amravati : अमरावती महापालिकेत २२ प्रभागांत ६६१ उमेदवार मैदानात; ६ लाख ७७ हजार १८० मतदार

Every voter will have to cast four votes in the ward; whether it is for a candidate or 'NOTA'?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :अमरावती महापालिकेत ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. चार सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना मंजूर असल्याने प्रत्येक मतदाराला चार मते द्यावेच लागणार आहे. मग ते उमेदवार असो की 'नोटा'. ईव्हीएमचे बटण चार वेळा दाबून लोकशाहीचा हक्क बजावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मतदान केंद्रातून मतदारांना बाहेर पडता येणार नाही, अशी राज्य निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे.
महापालिका निवडणुकीत आरक्षणानुसार 'अ', 'ब', 'क', 'ड' यानुसार प्रभागात चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. मात्र, प्रभागात बरेचदा काही मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार उमेदवार नसतात, अशावेळी काहीजण दोन किंवा तीन उमेदवारांना मते देण्याचे कर्तव्य बजावतात. मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक मतदाराला चार मते द्यावे लागणार आहे. महापालिकेत ६ लाख ७७ हजार १८० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
तर चौथे बटण 'नोटा'चे दाबावे लागेल
प्रभागात चार उमेदवार असताना एखाद्या मतदाराला तीनच उमेदवारांना मते द्यायचे असल्यास चौथे 'नोटा'चे बटण दाबावे लागेल, त्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. चारपैकी एकही उमेदवार मतदारांना योग्य वाटत नसल्यास अशावेळी 'नोटा' बटण दाबून मतदान करावे लागेल.
केंद्राध्यक्षांना मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यास किंवा वरीलपैकी एकही नाही, 'नोटा'या पर्यायासमोरील बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांचे नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले, आहे, त्या मतपत्रिकेवरील 'वरीलपैकी एकही नाही' (नोटा) या पर्यायासमोरील बटण स्वतः दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी.
चौथ्या मताचे काय होणार?
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केले आणि चौथे बटण हे 'नोटा' दाबले तर ते मत कोणत्याही उमेदवारांना झाले नसून ते गणले जात नाही. त्या मताची गणना "वरीलपैकी एकही नाही' अशी केली जाते. मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे १६ वे 'नोटा' बटण ठेवले आहे.
मनपा निवडणूक प्रभाग रचनेनुसार
अमरावती महापालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार मिळाला आहे.
प्रभाग पद्धती कशासाठी अवलंब ?
वार्ड रचनेत मतदाराला एकच मत देण्याचे अधिकार होते. मात्र अमरावतीला महानगराचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मतदारांना सुद्धा एका पेक्षा जास्त नगरसेवक निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहे.
"राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक घ्यावी लागते. अमरावती मनपात चार सदस्य संख्यानुसार मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. चार मते देणे बंधनकारक आहे. किंबहुना मतदारांना रिंगणातील उमेदवार नापसंती असल्यास ते 'नोटा' बटण दाबून शकतात. मतदान केल्याशिवाय मतदाराला केंद्रातून बाहेर जाता येत नाही."
- अनिल भटकर, निवडणूक निर्णय अधिकारी