प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:19 IST2026-01-06T19:17:28+5:302026-01-06T19:19:04+5:30
Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला रविवारपासून वेगाने प्रारंभ झाला आहे. मात्र, अमरावतीचा महापौर कोण होणार, याबाबत आरक्षण अद्यापही निघाले नाही.

Campaigning has started in full swing; but when will the reservation for the post of mayor be? What are the Election Commission's rules?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला रविवारपासून वेगाने प्रारंभ झाला आहे. मात्र, अमरावतीचा महापौर कोण होणार, याबाबत आरक्षण अद्यापही निघाले नाही. त्यामुळे नगर विकास विभागाच्या महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. महिला की सर्वसामान्य जागेसाठी? कोण होणार नवा महापौर याकडे अंबानगरीवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, अमरावती महापालिकेत १७महापौरपदासाठीचे व्या आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी निघणार आहे. अन्यथा सर्वसाधारण जागेसाठीसुद्धा महापौरपदाचे आरक्षण निघू शकते, असे संकेत मिळू लागले आहेत.
येत्या १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार संपणार आहे. त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी, प्रचार सभा, नेत्यांचे रोड-शो, कार्नर सभा, रॅली यांसह दारोदारी आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांना अवघे ८ दिवस मिळणार आहेत. तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना, काँग्रेस, युवा स्वाभिमान पक्ष महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी दावे-प्रतिदावे करू लागले आहेत. मात्र, महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने अमरावतीचा पहिला नागरिक कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचे 'हार्ट बीट' आरक्षणअभावी दरदिवशी वाढत असल्याचे वास्तव आहे.
आरक्षण भाजपची 'स्टॅटेजी'?
बृहन्मुंबईसह राज्यभरात २९ महापालिकेत महापौरपदासाठी आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे वेळेवर महापौरपदाचे आरक्षण काढून ते जाहीर करणे ही सत्तापक्ष भाजपची ही नवी 'स्टॅटेजी' असू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. कारण अगोदर महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले की, अंतर्गत स्पर्धा वाढते आणि त्यातून महापौरपदासाठी असलेल्या स्पर्धकांची 'विकेट' घेण्याची रणनीती सुरू होते.
काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ?
निवडणूक निकालाच्या एक दिवसापूर्वीसुद्धा महापौरपदाचे आरक्षण काढता येते, अशी राज्य निवडणूक आयोगाची नियमावली आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेचा नवा महापौर कोण, हे मतदानाच्या दिवशीसुद्धा जाहीर होऊ शकते, असे संकेत आहेत. राज्य शासनाकडून महापौरपदाच्या आरक्षणासाठी तूर्त कोणत्याही हालचाली नाहीत, अशी नगर विकास विभागाची माहिती आहे.