भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
By गणेश वासनिक | Updated: December 27, 2025 18:32 IST2025-12-27T18:28:43+5:302025-12-27T18:32:17+5:30
जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे- फडणवीस

भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
Amravati Municipal Corporation Election | गणेश वासनिक, अमरावती: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप-शिंदेसेनेत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाली आहे. युती नक्कीच होईल, कोणतीही अडचण नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच हा तिढा सुटेल. युती नक्की होईल आणि कोणतीही अडचण होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या चर्चेचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करीत असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते आशिष शेलार तसेच प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख नेते हे सर्वजण एकत्रितपणे चर्चा करीत आहेत. काल रात्रीपर्यंत घेतलेल्या माहितीप्रमाणे चर्चा अतिशय सकारात्मक मार्गावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.